Honey Trap Case : राज्यात सध्या चालू असलेल्या नाशिकच्या (Nashik) कथित हनी ट्रॅप प्रकरणावरून वातावरण तापलेलं असतानाच, ठाणे (Thane) जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका गरीब होमगार्ड महिलेवर दोन एसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप थेट तिच्या तोंडून समोर आलाय. या महिलेवर झालेलं अन्यायाचं हे कथित प्रकरण कुणाचंही काळीज चिरून टाकेल असंच आहे. सध्या ती महिला न्यायासाठी दरवाजे झिजवतेय आणि करुणा मुंडे (Karuna Munde) या महिला नेत्यानं तिच्या पाठिशी ठामपणे उभी राहत सरकारला थेट जाब विचारलाय.
करुणा मुंडे यांनी सदर महिलेसमवेत थेट पत्रकार परिषद घेतली आणि स्पष्ट केलं की, “ही कुठलीही हनी ट्रॅपची केस नाही, तर ही अत्याचाराची भीषण कहाणी आहे.” त्या महिलेनं माध्यमांसमोर ठाण्यातील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोटोही दाखवले. तिच्या म्हणण्यानुसार, “एका एसीपी अधिकाऱ्यानं मला जिममध्ये ओळख काढून मोबाईल नंबर घेतला. रोज चांगले मेसेज पाठवत होता. एक दिवस चहा प्यायला बोलावलं आणि आपली बायकोसुद्धा माझ्याशी बोललीय, असं सांगून विश्वास संपादन केला. पण त्याच दिवशी त्यानं आणि दुसऱ्या अधिकाऱ्यानं मला गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केला.”
पिडीत महिलेचं म्हणणं आहे की, “मी शुद्धीवर आल्यानंतर कलवा (Kalwa) पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, पण तक्रार घेतली गेली नाही. वरून मलाच खंडणीप्रकरणात अडकवलं गेलं.” इतकंच नाही, तर तिच्या दोन चिमुरड्या मुलींनाही त्रास देण्यात येतोय, असा दावा तिचा आहे. ती गेल्या ६ महिन्यांपासून डीसीपी, सीपी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे न्याय मागतेय, पण कुणीही तिचं ऐकायला तयार नाही.
या सगळ्या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे म्हणाल्या, “जर एक महिला होमगार्ड असूनही असुरक्षित असेल, तर इतर गोरगरीब महिलांचं काय? इथं अधिकारी आणि आजी-माजी मंत्री मन भरून हनीमून करतात आणि नंतर त्यांनाच तेच प्रकरण हनी ट्रॅप वाटायला लागतं. ही शोकांतिका नाही का?”
या महिलेने स्पष्ट इशारा दिलाय की, “जर पुढच्या आठ दिवसांत आरोपी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही, तर मी माझं आयुष्य संपवणार.”