IPS अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता; गौप्यस्फोटानंतर गृहमंत्र्यांचा यु टर्न

मुलुखमैदान: राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असे काहीही मी बोललेलो नाही. ते वाक्य माझ्या तोंडी टाकण्यात आले, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते. तो प्रयत्न वेळीच हाणून पाडला गेला, असे अनिल देशमुख यांनी म्हटल्याचे वृत्त आज प्रसिद्ध झाले होते.

चुकीचे विधान माझ्या तोंडी टाकण्यात आलं आहे. व्हिडीओ क्लिपिंग पाहा. मी या गोष्टी जाहीरपणे बोलू शकत नाही, इतकंच बोललो होतो’ अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न चार ते पाच पोलीस अधिकाऱ्यांनी केला होता. यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला’ असे अनिल देशमुखांनी सांगितले होते.

आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, असे सांगून या अधिकाऱ्यांकडून संबंधितांवर दबाव आणला जात होता. ही बाब लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सविस्तर चर्चा करून हे प्रकरण योग्यप्रकारे हाताळले, असे देशमुख यांनी सांगितल्याचे संबंधित वृत्तात म्हटले होते.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याचे समोर आले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.