Homeताज्या बातम्यागृहमंत्र्याचा उजवा हात असलेल्या कार्यकर्त्याची शिवसैनिकाला जीवे मारण्याची धमकी; सेना नेता म्हणतो...

गृहमंत्र्याचा उजवा हात असलेल्या कार्यकर्त्याची शिवसैनिकाला जीवे मारण्याची धमकी; सेना नेता म्हणतो आम्हाला जगू द्या

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. आता शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या जवळील व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे.

माजी शिवसेना खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आरोप केला आहे की, “राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता शिवसैनिकाला माझा व्हिडीओ स्टेटसला ठेवला म्हणून संपवून टाकण्याची धमकी देतो.” या घटनेची माहिती देत असताना माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, “आमचं पक्षाला इतकंच सांगणं आहे की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे, तर तुमचं चालू द्या, फक्त आम्हाला आमच्या जिल्ह्यात जगू द्या, आम्हाला मारू नका”, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना नमूद केलं आहे.

पुढे बोलताना शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील म्हणाले, “याच जिल्ह्यात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा उजवा हात असलेल्या कार्यकर्त्याने चार दिवसांपूर्वी माझ्या एका कार्यकर्त्याला माझा व्हिडीओ स्टेटसला ठेवला म्हणून धमकावलं. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तुला गावात राहायचं का, तुला संपवून टाकू अशी धमकी गृहमंत्र्यांचा उजवा हात असलेला कार्यकर्ता करतो आहे.”

“महाविकास आघाडीतील घटक पक्षाने आम्हाला पुणे जिल्ह्यात संपवण्याचा डाव करू नये, आम्ही तुमच्याकडे, सरकारकडे काही मागत नाही. आमची कुठलीच मागणी नाही, आम्हाला फक्त शिवसैनिक म्हणून सुखाने जगू द्या. आम्हाला संपवू नका, आम्हाला मारू नका,” असे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील त्या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

“आता आम्ही विकास करू द्या, निधी द्या या मागण्याही करायचं सोडून दिलं आहे. ही बैलगाडी शर्यत बंद करण्याचं कारण काहीच नव्हतं. फक्त शिवसेना नेता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या गावात शर्यत भरवली हे काही नेत्यांच्या डोळ्यात खुपलं म्हणून त्यांनी स्थगिती दिली. कुणाच्या डोळ्यात खुपतं हे सांगण्याची गरज नाही. संपूर्ण जिल्ह्याला आणि राज्याला हे माहिती आहे,” असे आढळराव पाटील म्हणाले.

“माझा शिवसेनेचा खेड तालुक्याचा पंचायत समिती सभापती सहा महिन्यांपासून तुरुंगात सडतो आहे. त्याच्यावर नाहक कलम ३०७ चा गुन्हा दाखल केला आहे. त्यावर डॉक्टरांचं प्रमाणपत्र देखील नाही. त्याला जामीन मिळू नये म्हणून राष्ट्रवादीचे आमदार आणि इतर नेते दबाव टाकत आहेत. ही गोष्ट मी माझ्या नेत्यांच्या वेळोवेळी कानावर घातली. त्यांनीही पाहिजे तशी मदत केली. परंतु हे चित्र एका बाजूला आहे. शिवसेनेच्या माझ्या सभापतीने काय घोडं मारलं होतं. त्याच्यावर खोटा गुन्हा का दाखल केला. त्याचं संपूर्ण घर तुरुंगात टाकलं,” असंही आढळरावांनी याठिकाणी नमूद केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
४ वर्षाच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांनी केला हल्ला, अंगाचे तोडले लचके; व्हिडिओ व्हायरल
जमीन वाटून देत नाही म्हणून मुलाने जन्मदात्या आईचा घेतला जीव, बापाचीही बोटे छाटली; पुण्यातील घटना
VIDEO:‘त्या’ अभिनेत्रीला मिठी मारणे रितेशला पडले महागात, घरी गेल्यानंतर जेनेलियाने धु-धु धुतला

ताज्या बातम्या