Hockey Player Julie Yadav Dies : फोन विसरला म्हणून घरी गेली, पण नियतीने खेळ केला…; सिलिंडर भरलेल्या ट्रकने राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूला चिरडलं

Hockey Player Julie Yadav Dies :  उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनऊ (Lucknow) शहरात रविवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरलं आहे. राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू आणि क्रीडा शिक्षिका जूली यादव (Julie Yadav) हिचा सिलिंडर भरलेल्या ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौदा मोड (Mauda Mod) परिसरात हा भीषण अपघात घडला.

मोबाईल विसरल्याने परत फिरणं ठरलं जीवघेणं

मिळालेल्या माहितीनुसार, जूली रविवारी सकाळी सुमारे 6:15 वाजता शाळेत होणाऱ्या इंटर-स्कूल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निघाली होती. काही अंतरावर गेल्यानंतर तिला लक्षात आलं की मोबाईल फोन घरीच राहिला आहे. त्यामुळे ती परत घरी जाण्यासाठी वळली आणि त्याच क्षणी सिलिंडर भरलेला डीसीएम ट्रक तिच्या मोटरसायकलवर आला आणि जोरदार धडक दिली.

अपघातानंतरचा थरार

या भीषण धडकेत जूली गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून तिला लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी ट्रक आणि त्याच्या चालकाचा शोध सुरू आहे.

जूली यादवचं कुटुंब

जूली पारा (Para) परिसरात राहत होती आणि एलपीएस (LPS) शाळेत क्रीडा शिक्षिका म्हणून काम करत होती. तिचे वडील अजय यादव (Ajay Yadav) शेतकरी असून आई गुड्डी देवी (Guddi Devi) गृहिणी आहेत. धाकटा भाऊ अमन (Aman) सध्या शिक्षण घेत आहे.

जूली केवळ शिक्षक नव्हती, तर राष्ट्रीय स्तरावर हॉकी खेळणारी प्रतिभावान खेळाडू होती. तिच्या अकाली निधनाने कुटुंब, मित्रमंडळी आणि क्रीडा क्षेत्र शोकसागरात बुडालं आहे.

लखनऊतील बेदरकार वाहनचालकांवर प्रश्नचिन्ह

या अपघातामुळे पुन्हा एकदा लखनऊतील वाहतूक व्यवस्थेवर आणि बेदरकार वाहनचालकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नागरिकांनी प्रशासनाला अशा अपघातांवर आळा घालण्याची मागणी केली आहे.