Share

Ajit Pawar in Pune: “आपलं वाटोळं झालंय! हिंजवडीचं आयटी पार्क बंगलोर-हैदराबादकडे चाललंय” – अजित पवारांचा संताप

Ajit Pawar in Pune : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सकाळच्या सुमारास हिंजवडी (Hinjewadi) परिसरात विकासकामांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी ना फक्त अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली, तर थेट हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर (Ganesh Jambhulkar) यांनाही खडेबोल सुनावले. ‘आपलं वाटोळं झालंय, सगळं आयटी पार्क बेंगळुरू आणि हैदराबादकडे चाललंय’ अशा थेट शब्दांत पवारांनी आपला राग व्यक्त केला.

पहाटेपासूनच ऑन फिल्ड दौरा

सकाळी सहा वाजता खुद्द अजित पवार यांनी कामकाजाची पाहणी सुरू केली. हिंजवडीत वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ते आणि नागरी सुविधा यावर त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी याच ठिकाणी आदेश दिले होते, त्या आदेशांची अंमलबजावणी झाली का, याची तपासणी त्यांनी आज केली.

सरपंचांना थेट सुनावलं

पाहणीदरम्यान गणेश जांभुळकर बोलत असताना अजित पवारांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं, “धरण करताना मंदिरं जातातच की नाही, तुम्हाला सांगायचं ते सांगा पण मी करायचं तेच करणार. आपलं सगळं आयटी पार्क बेंगळुरू, हैदराबादकडे चाललंय. पुण्यातून, महाराष्ट्रातून बाहेर चाललंय, आणि तुम्हाला पडलं नाही का?”.

‘कोणी अडथळा केला तर 353 दाखल करा’

अधिकाऱ्यांनी काही लोक कामात अडथळा आणत असल्याचं सांगितल्यावर अजित पवारांनी संतापून सांगितलं, “कोणत्याही व्यक्तीनं कामात अडथळा आणला तर त्याच्यावर थेट भारतीय दंड संहितेच्या 353 कलमानुसार गुन्हा दाखल करा, अगदी मीच मध्ये आलो तरीसुद्धा”.

काम होईपर्यंत गप्प बसायचं नाही

अजित पवार यांचा सूर सडेतोड होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, “हे काम करायचंच आहे. कोणीही आले, थांबवा, समजावून सांगा, नाही ऐकलं तर गुन्हा दाखल करा”. या शब्दांत त्यांनी कामांच्या अडथळ्याला नकार देत ठोस कारवाईचे संकेत दिले.

हिंजवडीच्या विकासासाठी ‘नो एक्स्क्यूजेस’

मेट्रो, रस्ते आणि वाहतूक सुधारणा यांसंदर्भात दोन आठवड्यांपूर्वी दिलेले आदेश किती अंमलात आलेत, हे पाहण्यासाठी आजचा दौरा केला होता. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि मेट्रो प्रशासनाला दिलेल्या सूचना कितपत पाळल्या जात आहेत, याचीही आज त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now