Hindustani Bhau on Raj Thackeray : महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषिकांमधील वाद पुन्हा उफाळून आला असताना, सोशल मीडियावरून एक नवा सूर समोर आला आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व आणि अभिनेता विकास पाठक (Vikas Pathak) याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर थेट टीका केली आहे. त्याने इंस्टाग्राम (Instagram) वर एक व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली.
मुंबई (Mumbai) येथे राहत असलेला हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) म्हणाला, “जय महाराष्ट्र हे मी मनापासून म्हणतो. पण, मराठी असण्याचा ‘गर्व’ आहे हे ठीक, पण त्याचा ‘माज’ करू नका. आणि त्याहूनही वाईट म्हणजे, मराठीच्या नावावर हिंदू बांधवांवर हल्ले करणं ही लज्जास्पद आणि चुकीची गोष्ट आहे.”
“भाषेचा आग्रह योग्य, पण मारहाणीचा मार्ग चुकिचा”
भाऊ पुढे म्हणतो, “शाळा आणि कॉलेजांमध्ये मराठी भाषा शिकवली जावी, यासाठी ताकद वापरणं योग्य आहे. पण कामासाठी आलेल्या गरीब, मेहनती लोकांवर हात उचलणं हे अयोग्य आहे. देशभरात मराठी लोकही वेगवेगळ्या राज्यांमध्ये राहतात, शिकतात आणि कमावतात. जर इतर राज्यांमध्ये त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला, तर आपण काय भूमिका घेणार?”
“हिंदू एकत्र आणा, फोडा नाही”
हिंदुस्तानी भाऊने राज ठाकरेंना संबोधून सांगितलं की, “बाळासाहेब ठाकरे यांची सावली तुमच्यात पाहिली जाते. त्यामुळे त्यांच्याच विचारांचा आदर ठेवून हिंदू समाजाला एकत्र आणा. मारामारी आणि फुटीरतावाद सोडा. जेव्हा तुम्ही म्हणता ‘मराठी बोलावं लागेल’, तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल, मग इतर राज्यांमध्ये असलेल्या मराठी लोकांशीही हेच केलं पाहिजे का?”
“सोशल मीडियावर भाऊचा स्पष्ट संदेश”
या व्हिडीओमध्ये हिंदुस्तानी भाऊने मराठी आणि हिंदी भाषिकांमधील सलोखा टिकवण्याचा आग्रह केला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे आणि दोन्ही बाजूंमध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत.