गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवड या दोन विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसब्याचा निकाल जाहीर झाला आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासनेंचा १११४० मतांनी पराभव केला आहे.
ही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी विशेष प्रतिष्ठेची केली होती. दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते, मंत्री, आमदार, खासदार या विधानसभा मतदारसंघात तैनात होते. त्यामुळे आजच्या निकालाकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. ही प्रतिष्ठेची जागा गमावल्याने भाजपवर मोठी नामुष्की ओढवली आहे.
हा विजय माझा एकट्याचा नसून मतदारसंघातील जनतेचा आहे. धनशक्ती विरूद्ध जनशक्तीचा हा विजय आहे. माझ्या विजयात कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे प्रचंड योगदान आहे असे कॉंग्रेसचे विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी सांगीतले.
2009 पासून हा मतदारसंघ संमिश्र झाला आहे. त्यानंतर तीनवेळा भाजपने विजय मिळवला असला तरी प्रत्येक वेळी किमान तिरंगी लढत होती. मतदारसंघ पुनर्रचनेनंतरची ही पहिलीच थेट लढत होती. आमचे हक्काचे मतदान कमी होऊन विरोधी पक्षाचे हक्काचे मतदान वाढल्याचे दिसत आहे असे भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासणे म्हणाले आहेत.
त्या भागातील कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींशी मी चर्चा करणार आहे. मी घरोघरी जाऊ शकलो नाही, पण आमचे कार्यकर्ते घरोघरी गेले. आम्ही विचार केला तसे घडले नाही. नाराजीमुळे फारसा फरक पडला आहे असे मला वाटत नाही. मीच कमी पडलो असे मला वाटते. मला वाटते की हा निकाल आश्चर्यकारक आहे. मला विजयाची खात्री होती. असेही हेमंत रासणे म्हणाले आहेत.
कसब्यामध्ये भाजपचा विजय हा नेहमीच शिवसेनेच्या पाठिंब्यावर राहिला आहे. आज शिवसेना हा माविआचा घटक आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. त्याचा परिणाम तिथे दिसून येतो. चिंचवडमध्ये भाजपला शेवटपर्यंत घाम फुटणार आहे. अशी प्रतिक्रीया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आपले वर्चस्व कायम राखले. केवळ एक-दोन फेरीचा अपवाद वगळता हेमंत रासणेंना रवींद्र धंगेकरांविरुद्ध निर्णायक आघाडी घेता आली नाही. अपेक्षेप्रमाणे कसब्यात लढत हेमंत रासणे आणि रवींद्र धंगेकर यांच्यात होती. मात्र रवींद्र धंगेकर यांनी पहिल्या फेरीत 3000 मतांची आघाडी घेतली होती.
त्यानंतर तिसऱ्या फेरीत भाजपचे हेमंत रासणे यांनी आघाडी घेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र हेमंत रासणे यांना शेवटच्या फेरीपर्यंत एकदाही आघाडी घेता आली नाही. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी प्रत्येक फेरीत आघाडी घेत मतांचे अंतर वाढवले. त्यामुळे हेमंत रासणे यांचा पराभव झाला आहे.
या सर्व घडामोडीनंतर रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष सुरू केला. हेमंत रासणे हे आज सकाळपासून मठात साधना करत आहेत. आपला विजय निश्चितच मिळेल, असा विश्वास त्यांनी सकाळी व्यक्त केला. मात्र, मतमोजणी पूर्ण झाल्यामुळे रवींद्र धंगेकर यांचा विजय निश्चीत झाला आहे.
त्यामुळे भाजपच्या दरबारात शांतता पसरली आहे. काँग्रेसमध्ये मात्र आनंदाचे वातावरण सुरू झाले आहे. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच रविवारी पेठेतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ समर्थक आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
धंगेकरांचे कार्यकर्ते जोरजोरात ओरडत आहेत, गुलाल उधळत आहेत, झेंडे गात आहेत आणि पन्नास खोके एकदम ओक्के अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत.