हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून केली रवाना

मुंबई। पंढरपूर आषाढी पायी वारी सोहळा कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. नियोजनाप्रमाणे काल लाल परीतून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरला रवाना करण्यात आली.

दरम्यान निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ७१ हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने फाडले आहे. या बातमीचा आधार घेत भातखळकर यांनी एक टीकात्मक ट्विट केले आहे.

“हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, त्याचेही ७१ हजार रुपयांचं बिल फाडलं…निर्लज्ज सरकार…, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकरांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

यंदा कोरोनामुळे आषाढी वारीवर शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे राज्यभरातील प्रमुख सात संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्यासाठी शासनाकडून शिवशाही बस उपलब्ध करून दिली जाईल, असे सुरूवातीला सांगण्यात आले होते.

दरम्यान, शासन विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देणार, असा समज संस्थानच्या विश्वस्तांचा झाला होता. याबाबद शासनाकडून कसलाही आदेश प्राप्त झाला नव्हता.

अखेर संस्थानने तीन दिवसांच्या मुक्कामाचे ७१ हजार रूपये प्रवासी भाडे भरले. त्यानंतर मंगळवारी सकाळी महामंडळाने पालखी पंढरपूरला नेण्यासाठी शिवशाही बस उपलब्ध करून दिली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.