Eknath Shinde : मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. विशेषत: मिठी नदी (Mithi River) ची पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने ती थेट धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. कुर्ला (Kurla) येथील क्रांती नगर (Kranti Nagar) आणि कुर्ला पूल (Kurla Bridge) परिसरात पाणी शिरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीचा सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
रात्रीपासून मुसळधार पावसाचा जोर कमी न झाल्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (National Disaster Response Force) घटनास्थळी तैनात करण्यात आलं आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) यांनी स्थानिक नागरिकांना जवळच्या शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात आश्रय घेण्याचे आवाहन केले असून, या शाळांमध्ये अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
उपमुखमंत्र्यांचा फील्डवर आढावा
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेत संबंधित यंत्रणांना आणखी चौकस राहण्याचे आदेश दिले आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यात (Thane District) हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून, पुढील दोन दिवसांसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, लोकांचे जीव हेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी परिस्थितीवर सतत नजर ठेवली असून, सर्व यंत्रणांचे पथक फील्डवरच कार्यरत आहे.
मिठी नदी जोरात वाहू लागल्याने जवळपास ३५० नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना मगन नथुराम शाळेत स्थलांतरित करण्यात आले. या ठिकाणी खानपानाची व्यवस्था बृहन्मुंबई महापालिकेकडून करण्यात आली आहे. सध्या समुद्राची भरती ओसरू लागल्याने नदीची पातळी ३.९ मीटरवरून ३.६ मीटर पर्यंत खाली आली आहे.
मुंबईत वर्क फ्रॉम होम
भारतीय हवामान खाते (India Meteorological Department) ने आज मुंबई शहर आणि उपनगरांसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation)
-
सर्व शासकीय
-
निमशासकीय
-
महापालिका कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा पूर्ववत सुरू राहतील.
उपनगरांमध्ये पावसाचा कहर
विक्रोळी (Vikhroli) येथे तब्बल २५५.५ मिमी, तर भायखळा, सांताक्रुज, जुहू आणि वांद्रे या भागांतही मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. सततचा पाऊस सुरु असल्याने मुंब्रा, कळवा आणि ठाणे खाडीकिनाऱ्याच्या भागांतही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाने खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.