मुंबईत मुसळधार पावसामुळे पाणी साचण्यास सुरवात; काही रस्ते केले बंद

मुंबई | हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार ३ आणि ४ जुलै रोजी मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता होती. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आहे.

आज मुंबईसह ठाणे, पालघर आणि अनेक उपनगरांमध्ये पाऊसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पाऊसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

अशात अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. अंधेरीच्या सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी साचले आहे. त्यामुळे सबवेकडे जाणारा मुख्य मार्गदेखील बंद करण्यात आला आहे.

साचलेल्या पाण्यामध्ये ऑटोरिक्षा आणि इतर वाहनं अडकून पडले असल्याची माहिती मिळाली आहे. सबवेच्या रस्त्यामध्ये जिथे जिथे पाणी साचलं तिथे पोलिसांकडून दोर लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत.

मुंबईमध्ये मेट्रोची काम सुरू असलेल्या ठिकाणी हे चित्र पाहायला मिळते. चर्चगेट परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सायन भागात षणमुखानंद सभागृह रोडवरील मुख्य रस्ता चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

आज हवामान विभागाने मुंबई ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य मुंबई, दादर, माहिम, चेंबूर परिसरात मुसळधार पाऊस पडतो आहे. तर नवी मुंबई, वाशी, बेलापूर परिसरात रिमझिम पाऊसाला सुरुवात झाली.

आयएमडीने मुंबईला व किनारपट्टीवर २४ ते ४८ तासासाठी पावसाचा इशारा दिला आहे. राज्याच्या किनारी भागासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.