Chandrashekhar Bawankule : भारतीय जनता पक्षाला (BJP) अखेर महाराष्ट्रात नवा प्रदेशाध्यक्ष लाभला आहे. रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून ते याआधी पक्षाचे कार्याध्यक्ष होते. या बदलानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एक भावनिक पत्र लिहिलं आहे, जे सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
सामान्य कार्यकर्त्यापासून नेतृत्वापर्यंतचा प्रवास
पत्राची सुरुवात करताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी कविवर्य ना. धो. महानोर (Na. Dho. Mahanor) यांच्या कवितेच्या ओळी उद्धृत केल्या आहेत – “कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे!”अशीच भावना सध्या आपल्याला होत असल्याचं ते नम्रपणे सांगतात.
आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात त्यांनी कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सायकल, मोटरसायकल किंवा पायी प्रवास करत, भिंती रंगवून आणि पत्रकं वाटून केली होती. आजवर त्यांनी गावोगावी जाऊन लोकांशी संवाद साधत, पक्षाच्या विचारधारेचा प्रचार केला आणि अखेर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहोचले.
प्रथमच पदाची जबाबदारी स्वीकारताना…
१२ ऑगस्ट २०२२ रोजी जेव्हा त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली, तेव्हा ते म्हणतात – “आनंद होता, पण त्याहूनही अधिक जबाबदारीचं दडपण होतं.” उत्तमराव पाटील (Uttamrao Patil), गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde), नितीन गडकरी (Nitin Gadkari), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांसारख्या दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवणं हे आपल्या दृष्टीने “शिवधनुष्य पेलणं” होतं, असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं.
महाराष्ट्रभर दौरे, संघटनपर्व आणि कार्यकर्त्यांशी संवाद
अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौरे केले, चांद्रापासून बांद्यापर्यंत (Chandrapur to Banda) प्रत्यक्ष पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ नेत्यांपर्यंत संवाद साधत पक्षसंघटनेचा विस्तार केला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा सदस्यसंख्या वाढून दीड कोटीपर्यंत गेल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला आहे.
यश-अपयशाच्या अनुभवातून शिकलेले धडे
अध्यक्षपदाच्या काळात दोन महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्या – लोकसभा आणि विधानसभा. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही, त्यामुळे त्यांना निराशा झाली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा (JP Nadda) यांचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यातून शिकून, विधानसभा निवडणुकीत विजय मिळवता आला.
मोदींच्या नेतृत्वात काम करण्याचा अभिमान
आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भूपेंद्र यादव, बी. एल. संतोष, शिवप्रकाश यांचे आभार मानले.
पत्राच्या शेवटी बावनकुळे लिहितात, “अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, कोणाला रागावलो असेन, तर मी मनापासून माफी मागतो.” तसंच “राष्ट्रप्रथम, मग पक्ष आणि मग स्वतः” या मूल्यांप्रमाणे काम करत राहण्याचं वचनही त्यांनी दिलं.