नाकाबंदीत पोलीसांनी अडवल्यावर त्याने घालवली संपूर्ण परीसरातील लाईट; पहा नेमकं काय घडलं..

वाराणसी | उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील नाकाबंदीदरम्यान एक विचित्र प्रकार घडला. लंका पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी वाराणसीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अमित पाठकही वाहनांची तपासणी करत उभे होते.

रात्री दोनच्या सुमारास ही नाकाबंदी सुरू होती. यावेळी वीज विभागामध्ये काम करणारा कर्मचारी संजय सिंह याला आडवण्यात आले होते. पोलिसांनी चौकशी केली असता संजयने आपण वीज विभागामध्ये काम करत असल्याचे सांगितले.

मात्र संजयकडे ओळखपत्राबद्दल विचारणा केली असता त्याच्याकडे ओळखपत्र नसल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलीस अधिकारी आणि संजयमध्ये मोठा वाद झाला.

हा वाद एवढा वाढला की या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी देखील संजयकडे ओळखपत्राची मागणी केली.

यामुळे संजय जास्तच संतापला त्यानंतर त्याने मी कोण आहे दाखवतो, असे म्हणत त्याने पुढील काही मिनिटांमध्ये असे काही केले की सर्वजण गोंधळून गेले.

संजयने करौंदी वीज उपकेंद्रामध्ये फोन केला आणि रात्री २ वाजून १३ मिनिटांनी नाकाबंदी करण्यात आलेल्या परिसरातील वीजपुरवठा खंडीत केला. हा प्रकार पाहून पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील गोंधळ उडाला.

या प्रकारामुळे सलग चार मिनिटांपर्यंत हा पूर्ण परिसर अंधारात होता. तेथील गोंधळलेली परिस्थिती पाहून दोन वाजून १७ मिनिटांनी संजयने परत फोन केला. त्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यास सांगितल्यानंतरच त्या भागातील वीज परत आली.

उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील नाकाबंदीदरम्यान हा विचित्र प्रकार घडल्यानंतर, या प्रकरणाची गंभीर दखल घेत एसएसपींनी संजयची तक्रार पूर्वांचल विद्युत वितरण निगमच्या व्यवस्थापकीय अध्यक्षांकडे केली.

या प्रकरणामध्ये चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर संजयच्या सांगण्यावरुन करौंदी उपकेंद्रातील रामलखन या कर्मचाऱ्याने वीजपुरवठा खंडित केल्याचे उघड झाले आहे.

लॉगबूकमध्ये वीजपुरवठा खंडित केल्याचा आणि पुन्हा सुरु केल्याचा वेळ नमूद करण्यात आला असला, तरी त्यामध्ये कारण लिहिण्यात आले नाही. हा वीजपुरवठा खंडित करताना योग्य काळजी घेण्यात आली नाही.

न्यूज १८ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, संजय आणि रामलखनविरोधात लंका पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर या दोघांनाही नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.