Hasan Mushrif : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी स्वतःवर झालेल्या ईडी (ED) चौकशीसंदर्भात मोठा दावा करत पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे त्यांच्या कागल (Kagal) येथील निवासस्थानी ईडीने छापेमारी केली होती. मात्र आता मुश्रीफ म्हणतात “माझी ईडीकडून कोर्टात निर्दोष मुक्तता आधीच झाली आहे.”
कागल नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा राजकीय भूकंप झाला आहे. हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) नेते तसेच शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjitsinh Ghatge) यांनी हातमिळवणी करत स्थानिक समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. या आघाडीमागे कोणत्या ‘अदृश्य शक्ती’चा हात आहे, यावर राजकारणात कुजबुज रंगली आहे. या नव्या युतीने दोन्ही बाजूंचे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत.
शिंदे गटाचे (Shinde Group) नेते आणि माजी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी या युतीवर टीका करत वातावरण अधिकच तापवले. त्यांच्या मते, “कागल तालुक्यातील विकास हा फक्त नावापुरता आहे; प्रत्यक्षात ही प्रॉपर्टी आणि राजकीय हितसंबंध वाचवण्याची युती आहे.” मंडलिकांनी असा दावा केला की, दबाव टाळण्यासाठी त्यांच्या उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे लागत आहे. तसेच “कोल्हापूरमध्ये जो एकटा पडतो, त्याच्या पाठीशी जनता उभी राहते” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय मंडलिकांच्या आरोपांना हसन मुश्रीफांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले “मंडलिकांनी बोलताना जपून बोलावे. मी तोंड उघडले तर बात दूर दूर तक जायेगी.” याशिवाय त्यांनी दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांची प्रतिष्ठा आठवताना संजय मंडलिकांवर अप्रत्यक्ष टिका केली. “स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक कुठे आणि संजय मंडलिक कुठे?” यातून त्यांनी मंडलिकांच्या राजकीय वजनावर आणि अनुभवावरच प्रश्न उपस्थित केले.
मुश्रीफ आणि घाटगे यांच्या नव्या आघाडीने कागलच्या राजकारणात हलचल निर्माण केली असून, दोन्ही गटांच्या स्थानिक ताकदीचा विचार करून नगराध्यक्ष पद मुश्रीफ गटाकडे आणि उपनगराध्यक्ष पद घाटगे गटाकडे जाण्याचा तात्पुरता फॉर्म्युला आखला गेल्याची माहिती मिळते. यामुळे कागल नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे.





