वचन होते रामराज्याचे दिले गुंडाराज; राहुल गांधींची योगी सरकारवर टीका

 

नवी दिल्ली | एकीकडे राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रासले आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये एका पत्रकारावर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली होती.

या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. वचन रामराज्याचे दिले होते, दिले गुंडाराज, अशा शब्दात राहुल गांधी यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये ते असे म्हणाले आहेत की, “आपल्या भाचीसोबत होत असलेल्या छेडाछेडीला विरोध केला म्हणून पत्रकार विक्रम जोशी यांची हत्या करण्यात आली.

माझ्या सहवेदना शोकाकूल परिवारासोबत आहेत. वचन रामराज्याचे दिले होते, दिले गुंडाराज”, अशा शब्दात राहुल गांधी यांनी योगी सरकारवर जहरी टीका केली आहे.

उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये एका टोळक्याने भर रस्त्यावर विक्रम जोशी या पत्रकारावर हल्ला केला होता. तसेच गोळीबार देखील केला होता. यात जोशी या पत्रकाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

या घटनेवरून उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर या प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पूर्ण उत्तर प्रदेशात हत्या आणि महिला सुरक्षेसह गंभीर गुन्ह्यांची संख्या प्रचंड वाढत चालली आहे. उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसपेक्षा गुन्हेगारांचा क्राईम व्हायरस जास्त झाला आहे.

सरकारने याकडे लक्ष द्यायला हवे, असे बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी म्हटले आहे. आठ पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबेची घटना अजून ताजी असतानाच त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.