अशा बऱ्याच घटना आपण बघितल्या असतील की संपत्तीच्या वादावरून अनेक भांडणे आणि काहीवेळा खुनही झाले आहेत. कोणीही स्वतःहून एखाद्या अनोळखी किंवा अगदी जवळच्या व्यक्तीला जमीन किंवा संपत्तीही देत नाही.
पण जर्मनीत एका आजींनी आपल्या शेजाऱ्यांच्या नावावर चक्क ५५ कोटींची मालमत्ता केली आहे. जर्मनीत बर्लिन शहरात राहणाऱ्या आजी रेनाटे यांनी रातोरात ५५.३५ कोटींची मालमत्ता शेजाऱ्यांच्या नावावर केली. या वृद्ध महिलेचा मृत्यू डिसेंबर २०१९ मधेच झाला होता.
रेनाटे या १९७५ पासून पती आल्फ्रेड वेसल यांच्यासोबत जर्मनीतील वाल्डोल्ड्सच्या वेपरफेल्डन या जिल्ह्यात राहत होत्या. त्यांचे पती स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असत. २०१४ मध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आणि २०१९ ला रेनाटे यांचा मृत्यू झाला.
८१ व्या वर्षी २०१९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना एक बहीण होती जी मूळ वारस होती तिचाही आधीच मृत्यू झाला होता. पण संपत्तीची माहिती तेव्हा उघडकीस आली जेव्हा जिल्हा प्रशासनाने एप्रिलमध्ये त्यांच्या इच्छेविषयी माहिती दिली.
आजींनी बँक बॅलन्स, शेअर्स आणि मौल्यवान वस्तू मागे ठेवल्या होत्या. त्यांनी अनेक शेजाऱ्यांच्या नावे मालमत्ता वाटून टाकली होती. पण शेजाऱ्यांना या पैशांचा उपयोग त्यांच्या वयक्तिक खर्चासाठी करता येणार नाही. हा सगळा पैसा परिसराच्या विकासासाठी असणार आहे.