Share

राज्यपालांना विधीमंडळात हस्तक्षेप करता येणार नाही; बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द होणार

bhagat

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ४६ बंडखोर आमदारांना सोबत घेऊन नवा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.(Governors cannot interfere in the legislature Rebel MLAs will be canceled)

विधिमंडळाच्या सभागृहातच एकनाथ शिंदे यांच्या नव्या गटाला मान्यता मिळू शकते. पण यामध्ये अनके अडचणी येऊ शकतात, अशी माहिती राजकीय तज्ज्ञांनी दिली आहे. शिवसेनेने १२ बंडखोर आमदारांच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेत त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली. शिवसेनेने यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्षांकडे प्रतोदांचे सही असलेले पत्र पाठवले आहे.

शिवसेना नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतीत कायदेशीर पिटीशनही दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यपालांना याबाबतीत कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे सांगितले जात आहे. महाविकास आघाडी सरकार टिकणार का नाही याचा निर्णय विधिमंडळातच होईल, असे विधिमंडळाचे निवृत्त सचिव अनंत कळसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

निवृत्त सचिव अनंत कळसे पुढे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता देणे यामध्ये राज्यपालांची भूमिका अतिशय मर्यादित आहे. ते हस्तक्षेप करू शकणार नाहीत. याबाबत कायदे अतिशय स्पष्ट आहेत. यापूर्वी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सहा आमदारांनी सरकाराचा पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपालांना दिले होते.”

“त्यावर विधानसभेचे त्यावेळचे अध्यक्ष अरुण गुजराती यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण गुजराती यांचा निर्णय कायम राहिला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा मार्ग वाटतो तितका सोपा नाही. कारण त्यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ घेऊ शकतात”, असे निवृत्त सचिव अनंत कळसे यांनी सांगितले आहे.

शिवसेनेकडून अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या आदेशाने ही नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे बंडखोर उमेदवारांनी एकनाथ शिंदे यांना आपला गटनेता म्हणून निवडलं आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणखी चिघळत चालली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘… तर एकनाथ शिंदेंची आमदारकी रद्द होणार’
पाकिस्तान ते सौदी अरेबिया, जगभरात सर्च केलं जातंय एकनाथ शिंदेचं नाव, ‘या’ नेत्यांना टाकलं मागे
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर भाजपने टाकला पहिला डाव; राज्यपालही रणांगणात

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now