Yashashri Munde: महाराष्ट्रातील भाजप (BJP – Bharatiya Janata Party) चे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे (Yashashri Munde) आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Vaidyanath Urban Co-operative Bank) या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, यानिमित्ताने त्यांचे राजकीय ‘लॉन्चिंग’ होत असल्याचे मानले जात आहे.
१० ऑगस्ट २०२५ रोजी वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळासाठी मतदान होणार असून, १२ ऑगस्टला मतमोजणी (Counting) पार पडणार आहे. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक होत असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
राजकारणात थेट प्रवेश
मुंडे कुटुंबातील पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि डॉ. प्रीतम मुंडे (Dr. Pritam Munde) या दोघी बहिणी आधीपासूनच राजकारणात सक्रीय आहेत. मात्र यशश्री मुंडे यापर्यंत राजकीय घडामोडींपासून दूर राहिल्या होत्या. काही वर्षांपूर्वी त्या दसराच्या (Dussehra Rally) व्यासपीठावर पंकजा मुंडेंसोबत पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यावेळीच त्यांच्या राजकीय इनिंगची चर्चा सुरू झाली होती.
शिक्षण आणि कारकीर्द
यशश्री मुंडे या शिक्षणाने वकील (Lawyer) असून त्यांनी अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठातून (Cornell University, USA) शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणादरम्यान त्यांना “प्रॉमिसिंग आशियाई विद्यार्थिनी” असा विशेष सन्मान मिळाल्याची नोंद आहे. त्यांच्या बहिणींच्या तुलनेत त्यांचे शिक्षण पूर्णपणे इंग्रजी माध्यमातून झाले आहे. आता वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत सहभागी झाल्यामुळे त्या राजकीय चर्चेत आल्या आहेत.
निवडणूक प्रक्रिया
या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख नुकतीच पार पडली असून, १४ जुलैला अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर १५ ते १९ जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. या प्रक्रियेनंतरच अंतिम उमेदवारांची यादी स्पष्ट होईल. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि यशश्री मुंडे यांनी मिळून एकूण ७१ अर्ज दाखल केल्याची माहिती आहे.