Gopichand Padalkar : सतत वादग्रस्त विधानं करणारे भारतीय जनता पक्ष (BJP) चे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांवर नाव न घेता अत्यंत आक्षेपार्ह आणि जातीधर्माच्या संदर्भाने टीका केली आहे.
पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांनी सांगली (Sangli) येथील ऋतुजा पाटील हत्या प्रकरणाविरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये भाषण करताना पडळकर यांनी एका विशिष्ट घराण्यावर बोट ठेवलं. त्यांनी त्या कुटुंबावर “कॉकटेल घर” असा उल्लेख करत धार्मिक व सामाजिक पद्धतींवर घाणेरड्या शब्दांत भाष्य केलं.
त्यांनी म्हटलं, “एकादशीच्या दिवशी मटण आणतात आणि दगडूशेठ गणपतीला जातात. संकष्टीच्या दिवशी उपवास असतो पण घरी मटण शिजतं. हे घर म्हणजे सासू ख्रिश्चन (Christian), नवरा ब्राह्मण (Brahmin), बाप मराठा (Maratha) आणि आई दुसरीच. हे म्हणजे एक अजब रसायन – म्हणजेच कॉकटेल कुटुंब.”
पडळकरांच्या या वक्तव्यावर आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी तीव्र शब्दांत उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं, “गोपीचंद पडळकर ही एक प्रवृत्ती आहे. त्यांना गावपातळीवर निवडून येण्याची लायकी नाही तरीही भाजपकडून (BJP) त्यांना पदं दिली जातात. हे लोक अशा पद्धतीने पवार कुटुंबीयांवर गलिच्छ भाषेत बोलतात.”
प्रशांत जगताप यांनी पुढे सांगितलं की, “पूर्वी मंगळसूत्र चोरी प्रकरणात पोलिसांनी पडळकरांना अटक केली होती. अशा व्यक्तीला पवार कुटुंबीयांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.”
या अगोदरही पडळकर यांनी अशाच प्रकारच्या शब्दांत टीका केली आहे. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.






