हॅलो मिस्टर डेथ! ७३ वर्षाच्या योद्ध्याने १९ दिवस कोरोनाशी लढत मृत्यूला कसं पळवून लावलं; वाचा स्वानूभव..

हॅल्लो, मिस्टर डेथ
सरकारी फतव्यानुसार महानगर पालिकेने आपल्या करोना चाचण्यांचा वेग वाढवला. आमच्या शेजारच्या सोसायटीच्या आवारातही एकटीम दाखल झाली. आदित्य (माझा मुलगा) बरोबर आम्ही तिथे पोहोचलो. नेहमीच्या सवयीने लवकर गेल्याने  नंबरही लवकरच लागला.

आजवर मी ऐकले,वाचले होते की करोना बुजुर्ग माणसांवर फिदा असतो.माझेही तसेच झाले.माझी चाचणी पाॅझिटिव्ह आली. नाहीम्हटलं तरी (खोटं कशाला बोलू?)खंत मात्र वाटलीच.तरीही शांत राहिलो.

बाधित व्यक्ती घरात असणे इतरही माणसांना त्रासदायक होऊ शकते.म्हणून आम्ही दोघे आदित्य बिर्ला हाॅस्पिटलला दाखल व्हायचेठरवले. दोघेही गाडीतून  हाॅस्पिटलला पोहचलो. प्रवासात काहीतरी बोलत होतो. “मी परत येणारअसा आशावाद माझ्या मनातहोता.मुलाचे मन काही मी वाचू शकलो नाही.

आजवर करोना बाबत प्रसार माध्यमातून अजिर्ण होईल इतके वाचले होते.व्हिडिओही पाहिले होते.पण ही बला आपल्या वाट्याला येईलअसे मात्र मनी मानसीही नव्हते. आता वाट्याला आलंय तर तोंड देणे भाग होते. मार्ग तर दोनच होते. *To be or not to be!*

एक तर हिंमत एकवटून करोनाला हरवून परतणे नाही तर सरळ शरणागती पत्करून यमराजाची शिकार होणे असे दोनच पर्याय होते. तसेही मी एकदा (२०१३१४) यमराजाचे दार ठोठावून आलो होतो.मात्र त्यावेळी पाठीशी *बायकोची पुण्याई* होती. आता ती नव्हती. *ती* नाही हे वास्तव होते.पण ते स्विकारण्याची मानसिकता मात्र दुबळी झाली होती. *’आई वडिलांची पुण्याई* असा खोटा गहिवरआणणारांनाबायकोची पुण्याईहा शब्दप्रयोग अंगावर झुरळ पडल्या सारखा वाटेल. पण त्याला इलाज नाही.

आदित्यने ऍडमिशन काऊंटरवर सगळे सोपस्कार पार पाडले. आता माझी वाट वेगळी असणार होती.तो एकटाच घरी परतणार होता. साधारण निरोपाचे बोलणे घरीच झाले होते.मी आता *कोविड १९* च्या वार्डाचा उंबरठा ओलांडून आत शिरत होतो.सासरी आलेली वधूमाप ओलांडून आत येते. माझ्यासाठी *व्हिल चेअर* आली.  स्वागताला वाॅर्ड बाॅईज नर्सेसचा ताफा होता.

घरून मी बॅग भरून गेलो होतो.दोनतीन पुस्तके,कागद,पेन काही कपडे असा सरंजाम घेऊन निघालेलो  होतो. हाॅस्पिटलला निघतानाचित्तवृत्ती शांत ठेवायचा माझा प्रयत्न होता. नाही तरी थैमान घालून, अश्रू ढाळून ऊपयोग नव्हता.

हा विभाग केवळ कोवीडच्या पेशंटसाठी होतारूढ भाषेत तो *हाॅटस्पाॅट* होता. बरोबर येणारे, भेटणारे आत येऊन जीव धोक्यातकशाला घालतील?त्यामुळे ती वर्दळ नव्हती.येथील .सी.चा गारवा आणि शांतता मला नवीन नव्हती.

माझ्या मागच्या  आजारपणात भेटणारांची कशी रीघ लागली होती! भेटायला मनाई असल्याने काही जण तर  शिव्या देण्याइतपतबिथरले होते. आता इथं मात्र कोणी येणार नव्हते आणि तेच त्यांच्या माझ्याही हिताचे होते.

आदित्य परत गेला असावा. करोनाचा मुकाबला करण्यासाठी मी त्याच्याच राज्यात  प्रवेश केला. त्यावेळी माझ्या चित्तवृत्ती कशा होत्या? सांगता येणार नाही.कारण तो विचार माझ्या डोक्यात नव्हता.

एका प्रशस्त खोलीत ठेवलेल्या एकमेव खाटेवर माझा मुक्काम निश्चित झाला. ईथं निवांतपणा होता. जेवण आले. जमेल तेवढे स्वाह: केले आणि गोळ्या घेऊन झोपी गेलो. वेगळे ठिकाण, वेगळे अंथरुण, पांघरुण वगैरेची बाधा मला झाली नाही.

जाग आली.पहाट असावी. सगळं कसं शांत शांत होतं. परत झोपी गेलो. पुन्हा जाग आली तेव्हा कधी तरी आलेला चहा चक्क थंड झालाहोता, नाष्टाही हजर होता. आता सकाळची क्रियाकर्मे आटपायची की नाष्टा करायचा हा प्रश्न होता. मी  सगळेच विधी फाट्यावर मारले प्रथम नाष्टा संपवला. गारढोण चहा एका घोटात पिलो.

तोवर नर्सबाई आल्या. ईंजेक्शने देण्यासाठी  हातावर जणू एक ब्रॅकेटच बसवले. शेतातल्या पाइपलाइन साठी जशी *बारी* असताततसा हा प्रकार. पण हाताची शिर सापडेपर्यंत मात्र शंभर ठिकाणी भोकं पडली होती. मला थोडं हाश्श हुश्श झालं हेही कबुल केलंपाहिजे. बेंबीजवळही इंजेक्शने देण्यात काय हशिल होता ते मात्र समजले नाही. गोळ्या खाण्यावर चांगलाच जोर होता. मला वाटत़ं, दुसरा किंवा तिसरा दिवस असावा. एकाच प्रकारच्या चौदा इतर पाच अशा एक़ोणिस गोळ्या बहिणाबाईने (सिस्टरने)माझ्या हातावरठेवल्या तेव्हा——

तेव्हा काय? s s s s! काही नाही हो!. दोन हप्त्यात मी त्या गिळंकृत केल्या. ‘औषधी गोळ्याहा आता पाच सात वर्षे माझ्या जीवनाचाअविभाज्य भागच झाला आहे.

वाॅर्डात प्रत्येक कर्मचारी मुखपट्टी बांधून असल्याने ओळख पटणे कठीण जाई. काही जण एकावर एक अशा दोन तीन मुखपट्ट्यावापरीत. ती मंडळी सुद्धा रोजच्या रोज कोविड रूग्णांना सेवा देत मेटाकुटीला आली असावीत. ईतर रूग्णांप्रमाणे त्वरीत दखल घेतलीजात नसे.त्यांच्याशी भांडून पदरी काहीही पडणार नव्हते.ईथंच रहायचं होतं ना!

युरिन पाॅट हवे असले तरी चारसहा वेळी आवाज देऊनही ते मिळेल याची खात्री नसे. त्यासाठी नेमलेली मावशी कुठं आहे हेही कोणालामाहित नसे.बिर्लामध्ये सहसा असे होत नाही हा माझा मागचा अनुभव होता. पण आता मात्र तसा अनुभव येऊ लागला होता.

वाॅर्ड . सी. असला तरी तापमान फारसे थंड नसे. ईथेही बाथरूममध्ये असणारी यंत्रणा मला अवगत झाली नाही.मग मी  एक  *मामा* ला  अंग पुसून देण्याची विनंती केली.तो  हुशार निघाला. कुठं पुसलं, कुठं नाही पुसलं आणि मग पसार.

शेवटी मीच जमेल तसे अंग पुसून घेऊ लागलो. पण ते श्रमही झेपेनात.धाप लागे.हळूहळू गात्रे थकत चालली होती.पाणी जास्त प्यायचेहोते आणि युरीन पाॅट द्यायला माणूस नसे. स्वत: जाण्याचीही शक्ती नव्हती.आलेले जेवण संपविले पाहिजे होते पण ते सपक,बेचव वाटेआणि खाण्याची वासनाच उरली नव्हती. जगणे हवे तर खाणे हवे होते. पण ते मात्र होत नव्हते.विचित्र पेच होता हा.

गोळ्या,सिरप्स, औषधे, ईंजेक्शने मात्र भरपूर होतीती वेळेवरच दिली जात. दिवसभरात डॉक्टर कधी येऊन गेले तेही कधी कधी कळत नसे.कारण मास्क आणि वरचा करोना प्रतिबंधकपोषाख यामुळे कोण, काय आहे ते कळणेच कठीण असे. माझ्या जवळ मोबाईल होता. पण  कोणाशी बोलावे तर एवढीही ताकद नसे. तेव्हा आणि आताही हे कोणाला पटणारे नाही. कारण आपण आपली मानसिकता लवचिक ठेवीत नाही.

आदित्यने सर्व मित्र, नातेवाईक हितचिंतकांना विनंती केली होती, ”कृपया पेशंटला फोन करू नये.मी स्वत: परिस्थिती कळवितजाईन.” त्यानुसार तो बहुतेकांना माहिती देत होता.कारण आमच्या डॉक्टरकडून त्याला रोजचा अहवाल फोनवरून कळत होता.तेव्हाकित्येकांना ते पटले नाही.त्यांना माझ्याशीच बोलायचे होते. अनेकजण अशा बुलेटिन वरही समाधानी होते. किंबहुना ही कल्पना त्यांनापसंत पडली होती. आणि दुसरा इलाज तरी कुठे होता,?मुलाचीही  कसोटीच होती. विचारपूस करणारेही मोठ्या संख्येने होते.

चार,पाच किंवा सहा दिवस लोटले असावेत. एक अनामिक नैराश्य मला घेरू लागले. वेळ,वार, महिना वगैरे भान राहिले नव्हते. तशीगरजही नव्हती.जीवन मरणाच्या लढ्यात तारखा,वार बघून काय उपयोग? “अमूक वार मरायला शुभ आहे,त्या दिवशी मेलात तर चांगलीगती मिळेल“! अशी भंपकबाजी करायला मृत्यू का सवड देतो?

अचानक  *तो* आणि मी दोघांत सूतभराचेच अंतर राहिले असे वाटू लागले. आता शरीर तरी का शिणवावे?आणि यापुढे थांबलो तरी मीह्या वयात काय दिवे लावणार आहे? माझा उपयोग तरी कुठं राहिलायं? असे अनेकानेक विचार मनावर ताबा मिळवण्याची खटपट करूलागले. त्यांचाविजयहोऊ पहात होता. त्या बेजार अवस्थेत मी आदित्यला मेसेज टाकला,”तू केले हे खूप झाले.आणि तसाही मीनिरूपयोगीच झालो आहे.त्राणही राहिलेले नाही.आता मला जाऊ दे“! असं काही बाही लिहिलं . तो तिकडे जागाच असावा.

बाप परत येणार अशी त्याची अपेक्षा असेल. माझा मेसेज त्याला हबकवून मात्र गेला.(हे मला नंतर कळले.) पण तरीही त्याने माझाकानच धरला जणू!

तुम्ही आम्हाला आजवर काय शिकवलेत ?वीस बावीस जणांना मार्गी लावलेत ते काय सांगून? ते काय म्हणतील“?वगैरे, वगैरे.
तो असं काही ऊत्तर देईल हा तर्क करायला माझाही विवेक जागा नसावा. पण मेसेज वाचल्यावर लक्षात आले की आपण काही तरीचविचार करतोय.आपलं भान सुटलंय का? मनोबल कमकुवत झालंय का? नाही, नाही.तसं होता कामा नये.!”

मी सावरल़ो. मृत्यू माझ्यामध्ये एक सुताचे तरी अंतर कायमचंच राहिलं आहे. आताही तेवढंच आहे. तो आसपास  कुठं तरी दबा धरून  बसलेला असेल. नाहीतर बेंडबाजा लावूनही येईल.त्याचं कोण धनी आहे*जरा*(म्हातारपण) *मरण* ह्यातून कोणीही प्राणी सुटलेला नाही. मग मीच कोण लागून गेलोय?

सकाळ झाली.एका खिडकी समोरच माझी खाट होती. बाहेरून एक मोठा वृक्ष होता.त्याच्या फांदीवर एक कावळा आला. मी तिकडेचपहात होतो. पुन्हा मन भरकटू लागले.”हा माझ्या पिंडासाठीच टपलाय.मी कधी गचकतो याची वाट पाहत असावा.”! भरकटलेले मन  थाऱ्यावर येताच एक कविता सुचली.ती मोबाइल वरच घेतली. पुन्हा झोप लागली.अति विचारानेही किती दमलो होतो मी! थोड्याशाडुलकीने मनावरचं मळभ हटलं. आता मी मरणार नव्हतो. मृत्यूला पहाटेच तर *हॅलो* करून आलो होतो.मागच्या आजारातील *ईजा* झाला, आताचा *बिजा* झाला. आता *तिजा* होणार नाही हे मीही जाणतो. आता तयारच राहिलंच पाहिजे. तो आला की *हॅलो, मिस्टर डेथ* म्हणतच निघायचं. जमवलेलं इथंच ठेवून अज्ञाताची वाट धरायची. ती वाट कशी असेल, कुठपर्यंत असेल ते सांगायलाकोणी परत आलेला नाही.

आदित्यशी रोजच संवाद चालू राहिलाशेवटचे पाचसहा दिवस वाॅर्ड बदललेला. एक वेगळी दुनिया होती ही. शेजारचे, त्यांच्या पलिकडचे पेशंट बोलत होते. *भस्म्या रोग* व्हावा तशी खाई खाई सुटली सगळ्यांनाच.चहा, नाष्टा येण्यापूर्वीच आम्ही तयार होत असू. ऊशाकडचे ऑक्सिजनचे मास्क हवे तेव्हाघालू/काढू लागलो.दहा पावलावरच्या संडासपर्यंत का होईना धापा टाकत चालू लागलो. हा मोठा पराक्रम होता आमचारात्री मात्र ऑक्सिजन मास्क घालून झोपायचे असा दंडक होता. जाणो ,रात्रीच काही कमीजास्त झाले तर?ही शंका त्यामागे होती.तीचुकीची नसावी.

आपल्या मानसिक शारीरिक शक्तीचा ईथे कस लागतो, गलितगात्र होऊनच बाहेर येणे होते. मुख्यत: “समोर येईल ते खायचे पुरेसे गरम पाणी प्यायचे  असा शिरस्ता ठेवला तर पुरेशी ऊर्जा येईल. तीच आपल्याला तारणार असते.

ईथल्या सुमारे एकोणिसवीस दिवसांतआंघोळहा विषय मनातून काढून टाकला होता. शेवटी शेवटी तर ते काम करणेच शक्य नव्हते. (घरी आल्यावर दोन तीन दिवस मनसोक्त आंघोळ केली.पण अंग पुसून होई पर्यंतच घाम फुटे. त्राणच राहिले नाही ना. सगळाच अवतारझाला होता.)

इथून सुटका कधी होणार ही शंका मन कुरतडीत असे.पण डॉक्टर *जा* म्हणे पर्यंत हलायचे नाही हा सर्वांचा मानस होता. आपणजिंकलो याची खात्री झाली होती.आणि बील किती झालं असेल ही विवंचना काही जणांना उदास करून जाई.

मी तो विचार करावा अशी परिस्थिती नव्हती.त्यामुळे बिनधास्त होतो. मुलाशी रोज एक दोन वेळा संवाद होत असे.तो माझा एक ऊर्जास्त्रोत होतादुर्भाग्यवश जे कोणी असे बिमार असतील त्यांनी आपलीच इच्छाशक्ती पणाला लावावी. मायेच्या माणसांनी त्याला उभारी द्यावी.बीलाचेपैसे उभारायचे मार्गही शोधावेत.हे करायला देव येत नाही. आपलीच माणसे ते करू शकतात. दु:खाचा लटका आव आणणारे काही कमीनसतात. त्यांना उदारपणे क्षमाच करावी.त्यामुळे *मानसिक थकवा* कमी जाणवतो.

लेखक – गोपाळ गु़ंड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.