Goodluck Cafe : शहरात दिवसरात्र राबणाऱ्या कामगारांपासून ते कॉलेजच्या तरुणाईपर्यंत हजारो लोक जेवणासाठी हॉटेलवर विसंबून असतात. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं, तर पोटाचं अन्न विषासारखं ठरू शकतं. अशीच अस्वस्थ करणारी घटना पुन्हा एकदा पुणे (Pune) शहरात घडलीये. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गुडलक कॅफे (Goodluck Cafe) मध्ये बन मस्कामध्ये काचेचा तुकडा आढळल्यामुळे प्रचंड वाद झाला होता. आता त्या प्रकरणावरची धूळ बसण्याआधीच दुसऱ्या ठिकाणीही गुडलकच्या शाखेत एक भयंकर प्रकार समोर आलाय थेट अंडा भुर्जीमध्ये सापडलं मेलं झुरळ!
मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) असलेल्या गुडलक फूड प्लाझामध्ये एका ग्राहकाने अंडा भुर्जी ऑर्डर केली. पण जेवताना त्याला भुर्जीमध्ये मेलं झुरळ दिसलं. याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर करत ही बाब उघडकीस आणली. फक्त फोटोच नाही, तर खात्रीसाठी त्याने बिलही पोस्ट केलं. त्यामुळे लोकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे आणि पुन्हा एकदा गुडलक कॅफे चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.
याआधीही फर्ग्युसन रस्त्यावरच्या (Fergusson Road) मुख्य गुडलक कॅफेमध्ये ग्राहकाच्या बन मस्कामध्ये काचेचा तुकडा सापडला होता. त्यावरून अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीनं हालचाल करत त्या शाखेचा परवाना तात्पुरता रद्द केला. त्यामुळे गुडलक बंद करण्यात आलं आहे. पण त्या तपासणीतही काही धक्कादायक त्रुटी सापडल्या होत्या.
FDA च्या तपासणीत खालील त्रुटी आढळल्या:
-
किचनमध्ये साचलेलं पाणी
-
फ्रिजमध्ये अस्वच्छता
-
उघड्या कचरापेट्या
-
कामगारांकडे वैद्यकीय प्रमाणपत्रांचा अभाव
-
तुटलेल्या टाईल्स आणि स्वच्छतेचा संपूर्ण अभाव
ही परिस्थिती लक्षात घेता, गुडलक कॅफेच्या स्वच्छतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विशेषतः या ठिकाणी बन मस्का, खिमा पाव आणि कॅरेमल पुडिंग खाण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी असते. हुसैन अली याक्षी (Hussain Ali Yakshi) यांनी 1935 मध्ये या कॅफेची सुरुवात केली होती आणि आता त्यांची तिसरी पिढी ते चालवत आहे. पण वर्षानुवर्षांची प्रतिष्ठा आता स्वच्छतेच्या बाबतीतल्या गोंधळामुळे धोक्यात आली आहे.
अन्न प्रशासनाने याआधी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यावरच गुडलक पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण त्याआधीच दुसऱ्या शाखेत झुरळ सापडल्यामुळे एकूणच गुडलकची विश्वासार्हता डळमळीत झाली आहे.