स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; नक्की वाचा

 

मुंबई। राज्यात कोरोना विषाणूचा धोका वाढत चालला आहे. अशात गेल्या महिन्यात लॉकडाऊनमध्ये सरकारकडून शिथीलता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक उद्योग सुरु झाले आहेत.

मात्र, शैक्षणिक वर्ष कधी सुरु होणार हे अजून निश्चित झालेले नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सध्या तेही घरातच बसून आहेत.

या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्युज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एमपीएससी परीक्षेचे ऑनलाईन कोचिंग क्लास सुरू करण्यात येणार आहेत.

अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. कोरोनामुळे अनेक एमपीएससी इच्छुक विद्यार्थी याबाबत मागणी करत होते. त्यानंतर मुंडे यांनी बार्टीला याबाबतचे ऑनलाइन क्लासेस सुरू करावे, अशा सूचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने ‘बार्टी’ने स्वत: पुढाकार घेऊन ऑनलाइन एमपीएससी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एमपीएससी इच्छुक उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्यासाठी ‘बार्टी’च्या http://www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड वरील ‘एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज’ या लिंकवर क्लिक करावे. ऑनलाईन कोचिंगचे बार्टीचे फेसबुक पेज व यूट्यूब चॅनलवरून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी आजपासून नोंदणी सुरू करावी असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात या क्लासेसचे उद्घाटन करण्यात येणार आहे, असेही बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी सांगितले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.