कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर; कांद्याचे दर आणखी वाढणार

मुंबई | राज्यात कांदा तुटवडा कायम असून आवश्यकतेपेक्षा कमी आवक बाजार समित्यांमध्ये होत आहे. होलसेल मार्केटमध्ये कांदा ४५ ते ५५ रुपये किलो दराने विकला जात आहे. पुरवठा कमी झाल्याने कांद्याच्या दरात ही लक्षणीय वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांतच कांदा दर दुप्पट झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

जानेवारी महिन्यात २५ ते ३० रुपये किलो दराने कांदा मिळत होता. परंतु फेब्रुवारीचा पहिला आठवड्यानंतर कांदा ठिकठिकाणी ६० रुपये प्रितिकिलो विकला जात आहे. कांदा आणखी काही काळ सर्वसामान्य ग्राहकांना रडवणार आहे. तज्ज्ञांच्या मते मार्चनंतर कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

कांद्याचे दर वाढण्याची कारणे
राज्यात आणि देशात ठिकठिकाणी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. या अवकाळी पावसाचा कांदा पिकाला जोरदार फटका बसला आहे. परिणामी बाजारात होणारा कांद्याचा पुरवठा घटला आहे. देशातील बाजारत ४० टक्क्यांनी पुरवठा कमी झाला आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. या सर्व गोष्टींची परिणाम थेट कांद्याच्या दरावर झाला आहे.

देशातील सर्वात मोठी बाजरपेठ असलेल्या लासलगाव एपीएमसीमध्ये गेल्या दहा दिवसांत कांद्याच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालायाच्या वेबसाइटनुसार जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात देशात सर्वच प्रमुख शहरांमध्ये कांद्याचे दर २५ ते ३५ रुपयांनी वाढले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.