सोन्याचे भाव पुन्हा घसरले, १० हजार रुपयांपर्यंत स्वस्त सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी

मुंबई । सध्या सण आणि लग्नसराई सुरू आहे, असे असले तरी सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. भारतीय सराफ बाजारामध्ये शुक्रवारी सोने-चांदीच्या किंमती कमी झाल्या आहे. यामुळे आता सोनं खरेदी करण्याची ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे. काल २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार ३३३ रुपये प्रति १० ग्राम झाला आहे.

तसेच चांदीची किंमत ६१ हजार ६३ रुपये प्रति किलो झाली आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी सोन्या-चांदीचा भाव कडाडला होता. ऑगस्ट महिन्यामध्ये सोन्याचा भाव ५६३०० रुपये प्रति तोळा एवढ्या विक्रमी स्तरावर गेले होते. यामुळे खरेदी करणे अवघड झाले होते.

चांदीही ७६ हजारांवर गेली होती. आता मात्र सोने जवळपास १० हजारांनी तर चांदी १५ हजारांनी स्वस्त झाली आहे. चांदी आठ महिन्यातील सर्वांत कमी भावावर आली आहे. यापूर्वी ९ जानेवारी रोजी चांदीच्या भावात एकाच दिवसात पाच हजार ८०० रुपयांची घसरण होऊन ती ६४ हजार ५०० रुपयांवर आली होती.

त्यानंतर मात्र भाववाढ होत जाऊन चांदी ६४ हजारांच्या पुढेच होती. आता ती ६२ हजार ५०० रुपये प्रति किलो या नीचांकी भावावर आली आहे. यामुळे आता मोठ्या प्रमाणावर खरेदी होण्याची शक्यता आहे. अनेकजण हा भाव कमी होण्याची वाट बघत होते.

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,३८० रुपये आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही.

सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. सामान्यपणे २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.