रात्री बोकड चोरला, कापला आणि सकाळी मालकालाच विकला; पण मालकाने मुंडके ओळखले

अमरावती । आपण घरात एखादे जनावर पाळल्यानंतर त्यात घरातील सर्वांचाच जीव अडकतो. त्याचा लळा आपल्याला लागतो. मात्र तेच जर अचानक चोरीला गेले तर अनेकांना अक्षरशः रडू येते. काहींना तर अन्न गोड लागत नाही. अशा घटना अनेक ठिकाणी घडत असतात. आता देखील अशीच एक घटना समोर आली आहे.

दर्यापूर अमरावती येथे लाडाने वाढविलेले बकरीचे पिलू त्या मालकाने प्रेमाने मोठे केले. दररोज हिरवा चारा व पशुखाद्य देत घरच्यांना त्याचा लळा लागला होता. मात्र हे बोकड रात्रीचे चोरीला गेले. यामुळे त्यांना एकच धक्का बसला. मग सगळीकडे शोध घेतला मात्र आढळला नाही.

असे असताना हे बोकूड कापून त्यांनाच विकण्याचा प्रयत्न झाला. या बोकडाला कातखेडा येथील राजेंद्र मोतिराम वानखडे यांच्या परिवाराने जीव लावला होता. मात्र ते चोरून नेल्याने त्याची सगळीकडे चर्चा देखील सुरू झाली. मात्र ते कुठे सापडले नाही.

आता बोकड मिळणार नाही, असे त्यांनाही वाटू लागले, आणि त्यांनी शोधाशोध थांबवली. असे असताना गावातीलच वेशीजवळ मटण विक्रेत्याचे दुकान लागले होते. घरच्यांचा आग्रह म्हणून व हरवलेल्या बोकडाच्या निराश विचारातून बाहेर यावे म्हणून मटण खाण्याची सर्वांची इच्छा झाली.

मात्र तेथे मटण घेत असताना त्यांना आपल्याच बोकडाचे मुंडके तेथे दिसले. त्यांनी जीव लावलेल्या बोकडाचा चेहरा त्यांना दिसला. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी जवळ जाऊन गवत बाजूला केले व ते कापलेले मुंडके आपल्याच बोकडाचे आहे, ते त्यांना समजले.

याबाबत त्यांनी दुकानदाराकडे चौकशी केली. मात्र त्याने काही माहिती नसल्याचे सांगितले. यामुळे हा वाद वाढला आणि पोलीस स्टेशन पर्यंत गेला. त्या दोघांच्यात वाद सुध्दा झाला. शेवटी राजेंद्र वानखडे यांनी येवदा पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी रोहन ढोके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. बोकडाला चोरून त्याचेच मटण या परिवाराला विकण्याचा प्रयत्न झाला होता. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.