Girish Mahajan on Tapovan Trees: नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी तपोवन (Tapovan) परिसरातील तब्बल १७ हजार झाडांवर कुऱ्हाड चालवला जाणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण करत आहे. या निर्णयामुळे नाशिकमधील नागरिकांनी जोरदार विरोध केला असून, सामाजिक माध्यमांवर आणि स्थानिक पातळीवर मोठा रडार उडालेला आहे.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शुक्रवारी मालेगाव (Malegaon) येथे आयोजित कार्यक्रमात खुलासा केला. “आम्ही वृक्षप्रेमी आहोत. कुठेही वृक्ष तोडण्याचे आमचे उद्दिष्ट नाही. मात्र तपोवनची ही जागा शेकडो वर्षांपासून साधुग्रामसाठी (Sadhugram) आरक्षित आहे. येथील मोठी झाडे कोणालाही हात लावत नाही, ती पूर्णपणे सुरक्षित राहतील. फक्त गेल्या पाच-सात वर्षांत उगवलेल्या रोपटींवरच आम्ही काम करणार आहोत. ही झाडं आम्ही दुसऱ्या ठिकाणी हलवून नवीन ठिकाणी लावणार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गिरीश महाजन म्हणाले की, “आम्ही पावसाळ्यात अनेक ठिकाणी झाडं लावतो. उदाहरणार्थ, कालपासून पंधरा हजार खड्डे खोदण्याचे काम सुरू झाले आहे. मी स्वतः हैदराबादला जाऊन आठ फुटी ते दहा फुटी झाडे आणून ती नवीन जागी लावणार आहे. जे झाडं सात-आठ वर्षांपूर्वी लावलेली आहेत, त्यांना सुरक्षित ठेऊन, फक्त रोपटींना हलवणार आहोत. त्यामुळे नागरिकांनी आमच्या भूमिकेचा योग्य अर्थ लावावा.”
त्यांनी पुढे सांगितले की, “येणाऱ्या दोन वर्षांत तपोवनात स्पष्ट बदल दिसेल. मोठी झाडं १०० टक्के जतन केली जातील. साधुग्रामसाठी ही जागा अत्यंत महत्त्वाची आहे कारण शेकडो वर्षांपासून साधू तेथे राहत आहेत. कुंभमेळा हा आपला सर्वात मोठा धार्मिक सोहळा आहे. झाडं काढली जात आहेत म्हणून कुणी वृक्षतोडाला आम्ही प्राधान्य देतो असे समजू नये. आम्ही ज्या १००० झाडांची तोडणी करू, त्याऐवजी पंधरा हजार झाडे लावू, हा आमचा प्रकल्प आहे. आणि यासाठी लागणारा खर्च महापालिका करणार आहे.”
गिरीश महाजनांच्या या वक्तव्यामुळे नागरिकांमध्ये थोडा दिलासा मिळाला आहे. ते स्पष्ट करतात की, जंगल व परिसराच्या नैसर्गिक सुसंगतीस व कुंभमेळ्याच्या तयारीला दोन्ही बाजूची काळजी घेतली जात आहे.





