मोठी बातमी! गणेशोत्सवात पुण्यात जमावबंदी, कलम १४४ लागू, ७ हजार पोलीसांचा खडा पहारा

पुणे । कोरोनाची तिसरी लाट आणि गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात जमावबंदी असणार आहे. गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने आता नियम लागू केले आहेत. कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात ७ हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. नियम तोडल्यास कारवाई केली जाणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी पुण्यात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये १० सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत कलम १४४ लागू असेल. यामुळे आता पुणेकरांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पुण्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

यावर्षी आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नाहीत. गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे सात हजार पोलीस कर्मचारी, ७०० अधिकारी यासह सर्व पथके तैनात करण्यात आली आहे. तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश असेल. गणेशोत्सवात गुन्हे घडू नयेत यासाठी वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यामुळे पुणे पोलिसांनी आता दक्षता देण्याचे आवाहन केले आहे. गणेश मंडळांच्या एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली आहे, त्यांनी त्यांच्या काही मागण्या त्यांच्याकडे केल्या आहेत.

यामध्ये ढोल पथक, आणि कमान टाकण्याची परवानगी मागितली आहे. मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आता सण साजरा करताना साध्या पद्धतीने करण्यात यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियम तोडणाऱ्या मंडळावर कारवाई केली जाणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.