Share

Gadchiroli Accident News: रस्त्यावर व्यायाम करताना भरधाव ट्रकनं 6 मुलांना चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू

Gadchiroli Accident News :  गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर काटली (Katli) गावाजवळ भीषण अपघातात चार युवकांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळच्या सुमारास रस्त्यावर व्यायाम करत असलेल्या सहा तरुणांना अज्ञात भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित चार जणांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. त्यातील दोन जणांनी उपचारादरम्यान प्राण सोडले.

या अपघातामुळे काटली गावात शोककळा पसरली असून, संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिस (Gadchiroli Police) घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

सर्व युवक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते, त्या वेळी ट्रकने त्यांना चिरडले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने नागपूर (Nagpur) येथे हलवण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आर्थिक मदतीची घोषणा

या दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटलं की, “गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर झालेला हा अपघात अतिशय वेदनादायक आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.”

मुख्यमंत्री म्हणाले की, जखमींवर गडचिरोली सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून, त्यांना नागपूरला हलवण्यासाठी हेलिकॉप्टरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे.

दोन महिलांचा दुर्दैवी अंत

दरम्यान, परभणी (Parbhani) जिल्ह्यातील दैठणा (Daithana) गावात देखील अशीच हृदयद्रावक घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या पुष्पाबाई उत्तमराव कच्छवे (Pushpabai Uttamrao Kachhave) आणि अंजनाबाई शिसोदे (Anjanabai Shisode) या दोन महिलांना अज्ञात वाहनाने धडक दिली. दोघींचा जागीच मृत्यू झाला.

गावात यामुळे शोककळा पसरली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now