मुंबई | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहेत. कोरोना काळात पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. त्यात आता राज्यातील सात जिल्ह्यामध्ये डिझेलचे दर ८० रुपयांच्या वर गेले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढवल्याचे जाहीर केले. डिझेलच्या दरात १८ ते २० पैशांची वाढ झाली तर पेट्रोलचे दर १५ ते १७ पैशांने वाढले होते. त्यात आज पुन्हा वाढ झाली आहे. कोरोना काळात पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.
महाराष्ट्रभरातील तब्बल १९ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या किंमतींनी ९० रुपयांचा टप्पा ओलांडला असून मुंबई त्या उंबरठ्यावर आहे. मुंबई शहरामध्ये डिझेलची किंमत २४ पैशांनी वाढून ७९.६६ रुपयांवर गेली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलच्या किंमतीही १९ पैशांनी वाढल्या आहेत.
मागील काही दिवसांत राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढताना पाहिला मिळत आहेत. २५ नोव्हेंबरला ७७ रुपये ९ पैसे प्रति लिटर दर असणारे डिझेल आज ७९ रुपये ६६ पैसे इतके झाले आहे. मागील ९ दिवसांमध्ये डिझेलमध्ये १ रुपया ७६ पैसे इतकी दरवाढ झाली आहे.
तसेच मुंबईत मागील काही दिवसांपासून डिझेलच्या किंमतीत होणारी दरवाढ ही आता ८० रुपयांपर्यंत येऊन पोहचली आहे तर दुसरीकडे पेट्रोलच्या किंमतीमध्ये देखील सातत्याने दरवाढ सुरूच आहे. आज पेट्रोलचा भाव ९० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. इंधन दरवाढीमुळे आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.