चार दिवस खिडकीत कपडे वाळत घालू नका, मोदी येणार आहेत; पोलीसांच्या नागरीकांना अजब सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जाते. असे असताना उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यामुळे राज्यात दौरे केले जात आहेत. भाजपकडून देखील हा गड ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

असे असताना भाजपचे केंद्रीय मंत्री राज्यात दौरे करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील दौरे वाढले आहेत. निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा झाली नसली तरी पुढील वर्षी ही निवडणूक पार पडणार आहे. नरेंद्र मोदी देखील उत्तर प्रदेशमध्ये दौरे करत आहेत.

आता पुन्हा एकदा मोदी २२ नोव्हेंबर म्हणजेच सोमवारी राजधानी लखनऊमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र या बंदोबस्ताची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी एक पत्र जारी केले आहे. मोदींचा सुरक्षेचा भाग म्हणून पोलिसांनी या भागातील लोकांना १९ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान खिडकीमध्ये, बाल्कनीत कपडे वाळत घालू नका असे आदेश दिले आहेत. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. अशा सूचना का दिल्यात याबाबत सध्या नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

या पत्रात असे म्हटले आहे की, गोमतीनगर सेक्टर चारमधील सरस्वती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सर्वांना १९ नोव्हेंबर २०२१ ते २२ नोव्हेंबर २०२१ दरम्यान बाल्कनी किंवा बाल्कनीच्या आजूबाजूला कुठेही कपडे किंवा इतर गोष्टी लटकवू नका. नवीन व्यक्ती इमारतीमध्ये वास्तव्यास आल्यास त्याची माहिती पोलिसांना द्या, असे म्हटले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने या भागामधील सर्व उंच इमारतील आणि टॉवर्सला सूचना केल्या जात आहेत. यामध्ये सरस्वती अपार्टमेंट थेट पोलीस मुख्यालयाच्या समोर असल्याने तुम्हालाही यासंदर्भात सूचना करण्यात येत आहे, असं पोलिसांनी इमारतीच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.