Vaishnavi Hagwane : मुळशीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबातील सुनेचा संशयास्पद मृत्यू प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनत चाललं आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप झाले असून, आता तिची जाऊ मयुरी हगवणे हिने पुढे येऊन सासरच्या अमानवी वागणुकीचा थरकाप उडवणारा पर्दाफाश केला आहे.
“छोट्या-छोट्या गोष्टींवरून सुरू झाला छळ” – मयुरी हगवणे
माध्यमांशी बोलताना मयुरी हगवणेने सांगितलं की, लग्न झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यांतच सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला होता. “कपडे कसे घालते, साडी कशी नेसते, सासऱ्यांकडे बघते की नाही यावरून ननंद त्रास द्यायची. एवढं सगळं वाढलं की माझा नवरा स्वतः मला आईकडे सोडून गेला. कारण त्यालाही वाटत होतं की या घरात मला जिवंत ठेवणार नाहीत,” असं ती म्हणाली.
वैष्णवीला सतत मारहाणीचा सामना करावा लागला
मयुरीच्या म्हणण्यानुसार, वैष्णवीच्या मानसिक आणि शारीरिक छळाची माहिती बाहेर फारशी यायची नाही. मात्र घरात काम करणाऱ्या व्यक्ती तिला सांगायचे की वैष्णवीला मारहाण केली जाते, तिच्यावर सतत अत्याचार होत असत. “माझी वैष्णवी जाऊ असूनदेखील आम्ही दोन वर्षात एकदाही बोललो नाही, तिला किती त्रास होतो हे आम्हाला दिसायचं, पण आम्ही काही बोलू शकत नव्हतो,” असं मयुरीने सांगितलं.
सासरकडून नवऱ्यालाही त्रास, ‘फॉर्च्युनर’ची हाव
मयुरीने केलेल्या आरोपांनुसार, सासरच्या मंडळींची हावगिरी इतकी होती की त्यांनी वैष्णवीच्या माहेरकडून फॉर्च्युनर कार, गॉगल, महागडे मोबाईल आणि घड्याळं घेतली. “हे सगळं माझ्यासमोर घरात आलं होतं. शशांक त्याचा रौद्र रूपात रुबाब दाखवायचा, ‘तिला कसं धाकात ठेवतो’, असं म्हणायचा,” अशी आठवण मयुरीने सांगितली. इतकंच नाही तर, तिच्या नवऱ्यालाही घरच्यांनी टोचणी लावली की तू बायकोचं ऐकतोस, त्यामुळे त्यालाही मानसिक त्रास सहन करावा लागला.
मृत्यूनंतर बेपत्ता असलेलं बाळ अखेर घरी परतलं
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं केवळ 10 महिन्यांचं बाळ काही काळ बेपत्ता होतं. अखेर ते बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचं समजलं आणि आता ते परत कस्पटे कुटुंबाकडे आले आहे. या घटनेने वैष्णवीच्या परिवाराला काहीसा दिलासा मिळाला असला तरी संपूर्ण प्रकाराने समाजमन हादरून गेलं आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण आता केवळ एक कौटुंबिक दुर्दैवी घटना राहिलेली नाही. सततचा छळ, हुंड्याची मागणी, मानसिक व शारीरिक अत्याचार, आणि अखेरीस एक तरुणीचा संशयास्पद मृत्यू — या सर्व बाबी सासरच्या क्रौर्याचे भयावह चित्र उभे करतात. आता जाऊ मयुरी हिने केलेले स्पष्ट आणि थेट आरोप या प्रकरणात आणखी गडद वळण आणू शकतात.
fortuners-mother-in-law-demands-vaishnavi-hagwanes-mother