Pune : शिरूर(Shirur) तालुक्याच्या प्रतिष्ठित पलांडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माजी आमदार सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांचे नातू आणि कोकण भवन येथील उपायुक्त संजीव पलांडे यांचे सुपुत्र शर्विन ऊर्फ चिकू (वय २०) यांचे रविवारी आकस्मिक निधन झाले. सोमवारी मुंबईत अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यविधीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शर्विन यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. लहानपणापासूनच ते अभ्यासात प्रगल्भ होते आणि सध्या ते वकिलीचे शिक्षण घेत होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांवर अपार दुःख कोसळले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, आजी-आजोबा, आत्या आणि मामा असा परिवार आहे. शर्विन यांचा दशक्रिया विधी येत्या शनिवारी, १९ एप्रिल रोजी, मुंबईत पार पडणार आहे. पलांडे कुटुंब शिरूर तालुक्यात राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि प्रभावशाली मानले जाते.
सुर्यकांत पलांडे यांनी आमदार म्हणून शिरूरच्या विकासात मोलाचे योगदान दिले असून, त्यांचे पुत्र संजीव पलांडे सध्या प्रशासकीय सेवेत उपायुक्तपदावर कार्यरत आहेत. कुटुंबाच्या सामाजिक कार्याची परंपरा पुढे चालवण्याची आशा शर्विन यांच्याकडून होती. मात्र, त्यांच्या अकस्मात निधनाने ही आशा अपूर्णच राहिली. शिरूर तालुका आणि मुंबईत त्यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे.
former-mlas-grandson-dies-suddenly-in-pune