माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन

 

पिंपरी। पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज सकाळी चिंचवड येथील खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणजोत मालवली.

साने राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातुन तब्बल तीन वेळा ते निवडून आले होते. लॉकडाऊन काळात त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली होती. मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे वाटप केले होते.

त्यावेळी त्यांचा अनेक नागरिकांशी थेट संपर्क आला होता. ‘दत्ताकाका’ या नावाने चिखली परिसरातच नव्हे तर संपूर्ण शहरात परिचित होते. २५ जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनासह निमोनियाची देखील लागण झाली होती. साने यांच्या निधनामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

चिखली येथील प्रभाग क्रमांक एक मधून ते निवडून आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत ते सलग तीन कार्यकाल नगरसेवक होते. विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारीही त्यांनी चोक पार पडली होती.

महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय समितीचे ते माजी अध्यक्ष होते. एक झुंझार, आक्रमक व अभ्यासु कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. भोसरी मतदारसंघातुन निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.