शेतकऱ्यांचे आणि सामान्य ग्राहकांचे वीज बिल माफ करा; भाजप नेत्यांची मागणी

 

पुणे। शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या वीज बिलामध्ये कुठल्याही प्रकारचे मोजमाप न करता अन्यायकारक वीज बिलामध्ये वाढ केली आहे. याला भाजपचा विरोध आहे. ही वीज बिले अन्यायकारक असून महाराष्ट्र सरकारने ती त्वरित मागे घ्यावीत.

तसेच लॉकडाऊनच्या काळातील नियमाप्रमाणे शेतकऱ्यांचे आणि ग्राहकांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज पुण्यात झालेल्या आंदोलनाद्वारे केली.

“केंद्र सरकारने जनतेला विविध पॅकेज दिले आहेत. तर राज्य सरकारने एक नया पैसा देखील जनतेला दिला नाही म्हणून सरकारने हे वीज बिल माफ करावे”, असेही पाटील म्हणाले आहेत.

जून महिन्यामध्ये राज्यातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या या सर्वांना सरकारने वाढीव बिलाची आकारणी करून वाटप केले.

याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने आज पुण्यातील रास्ता पेठ येथे महाराष्ट्र वीज वितरण कंपनी समोर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी हातात कंदील घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच वाढीव वीज आकारणी बिलाची होळी करून निषेध केला.

यावेळी भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार भीमराव तापकीर, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.