पुणे | कोविड सेंटरमध्ये अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच पुण्यामध्ये आता खास महिलांसाठी कोविड सेंटर चालवलं जात असल्याची बातमी समोर आली आहे.
पुण्याच्या राजगुरुनगर येथे चालवण्यात येणाऱ्या या कोविड सेंटरमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि सर्व वैद्यकीय कर्मचारी या महिलाच आहेत. देशातील हे एकमेव सेंटर असेल की ज्याचे संपूर्ण संचलन महिलांना करत आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या राजगुरुनगरमधील अपेक्स हॉस्पिटलच्या बंद असलेल्या इमारतीचा ताबा घेऊन आरोग्य विभागाने १३ जुलैला हे खास महिला कोविड सेंटर सुरु केले आहे.
या रुग्णालयात डॉक्टर शीतल पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन महिला डॉक्टर आणि अकरा महिला कर्मचारी अशा एकूण १४ महिला काम करत आहेत. ज्या महिलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
सध्या या रुग्णालयात ४० पेक्षा अधिक महिला रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील काही महिला उपचारांमुळे कोरोनामुक्त होऊन होऊन घरी देखील गेल्या आहेत.