Share

ED : मुंबईतील ईडी कार्यालयात मध्यरात्री आग, महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे जळून खाक; मंत्रालयातील आगीच्या आठवणी ताज्या

ED : सोमवारी पहाटे मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील काइजर-आ-हिंद इमारतीत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) झोनल ऑफिस क्रमांक-1 मध्ये भीषण आग लागली. या घटनेत कार्यालयाला मोठे नुकसान झाले असून, ईडीच्या अनेक महत्त्वाच्या फाइल्स आणि डिजिटल पुरावे आगीत जळून खाक झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली आणि पाहता पाहता ती चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर पसरली. काही मिनिटांतच आगीने संपूर्ण इमारतीला वेढले. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तासन्तास शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली.

महत्त्वाच्या फाइल्स आणि उपकरणांचा अक्षरशः भस्मसात

ईडीच्या मुंबईतील दोन कार्यालयांपैकी ही घटना झोनल(ED) ऑफिस 1 मध्ये घडली. या आगीत अनेक महत्त्वाच्या तपास फाईल्स, जप्ती अहवाल आणि डिजिटल उपकरणे पूर्णतः जळून नष्ट झाल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे काही महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात

सध्या अग्निशमन दल आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ आगीच्या कारणाचा तपास करत आहेत. आग ज्या प्रकारे पसरली आणि झालेले नुकसान पाहता, काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, ईडीने स्पष्ट केले आहे की सर्व महत्त्वाच्या तपास प्रकरणांचा बॅकअप सुरक्षित आहे आणि कार्यालयाचे कामकाज लवकरच पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ही दुर्घटना ईडीच्या कार्यपद्धती आणि सुरक्षा व्यवस्थांबाबत नव्याने प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे.
fire-breaks-out-at-ed-office-in-mumbai-at-midnight

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now