Share

FIDE Women’s World Cup Champion 2025 News : महाराष्ट्राची लेक ठरली बुद्धिबळाची राणी! दिव्या देशमुखने वर्ल्ड कप जिंकत घडवला इतिहास

FIDE Women’s World Cup Champion 2025 News : जॉर्जियामधील (Georgia) बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 (Women’s Chess World Cup 2025) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या (Maharashtra) दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने भारतीय बुद्धिबळ इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाणारं पान जोडलं. नागपूरच्या (Nagpur) या 19 वर्षांच्या खेळाडूने अनुभवी कोनेरू हम्पी (Koneru Humpy) हिला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकला आणि भारतासाठी एक नविन कीर्ती प्राप्त केली.

टायब्रेकरमध्ये निखळ बुध्दीचं सामर्थ्य!

सामन्याच्या मुख्य फेऱ्यांमध्ये दोघींनी एकमेकांना चांगलीच टक्कर दिली. कुणीही मोठी चूक केली नाही. अखेर सामना टायब्रेकरमध्ये गेला. या टप्प्यावर, काळ्या मोहरांवर खेळत असताना दिव्याने अत्यंत शांत, तितकीच हुशार आणि संयमी खेळी करत निर्णायक बाजी मारली.

टायब्रेकर म्हणजे एक प्रकारचा ‘सडन डेथ’ जेव्हा सामन्याचा निकाल काढण्यासाठी वेळेवर आधारित वेगळा राउंड घेतला जातो. प्रत्येक खेळाडूला 15 मिनिटांचा वेळ आणि प्रत्येकी चालीनंतर 10 सेकंद वाढ मिळते. दिव्याने या टप्प्यातही हम्पीला एकही संधी न देता सरळ विजय आपल्या नावावर केला.

कोण आहे ही दिव्या देशमुख?

नागपूरची (Nagpur) दिव्या देशमुख (Divya Deshmukh) केवळ वर्ल्ड कप विजेती ठरली नाही, तर याच विजयानंतर तिला “ग्रँडमास्टर” (Grandmaster) ही मानद पदवीही मिळाली आहे. वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी असा पराक्रम करणे म्हणजे आजच्या तरुण भारताची, विशेषतः तरुणींनी जगात किती प्रगती केली आहे याचं उत्तम उदाहरण आहे.

भावनांनी भरून आलं होतं विजयानंतरचं क्षण

विजयानंतर दिव्या देशमुख अत्यंत भावूक झाली होती. हे तिचं स्वप्न होतं, जे तिने चिकाटी, मेहनत आणि जिद्दीने सत्यात उतरवलं. विशेष म्हणजे, दिव्या आधीच ‘कँडिडेट्स टूर्नामेंट’ (Candidates Tournament) साठी पात्र झाली होती  ही स्पर्धा बुद्धिबळातील विश्वविजेतेपदाच्या दिशेने एक निर्णायक पाऊल मानली जाते.

या ऐतिहासिक विजयाबरोबरच दिव्याला तब्बल ५० हजार डॉलरचं पारितोषिक मिळालं म्हणजे जवळपास ४२ लाख रुपये. उपविजेती कोनेरू हम्पी (Koneru Humpy) हिला ३५ हजार डॉलर म्हणजे सुमारे ३० लाख रुपये  देण्यात आले. या दोघींनी भारताच्या बुद्धिबळ विश्वात नवा आत्मविश्वास जागवला आहे.

भारतामध्ये बुद्धिबळाचं आकर्षण झपाट्याने वाढत आहे. दिव्या देशमुखसारख्या खेळाडूंमुळे तरुणाईला नविन प्रेरणा मिळतेय. एकीकडे पारंपरिक खेळांपेक्षा बुद्धिबळात भारताला जागतिक पातळीवर ओळख मिळत आहे, आणि त्यात महिलांची भूमिका आघाडीवर आहे हेच या स्पर्धेने दाखवून दिलं.

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now