शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तुषार, ठिबक सिंचनावर आता मिळणार ७५ ते ८० टक्के अनुदान

एक मोठा निर्णय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, तिनही कृषी कायदे मागे घेण्यात येणार आहेत. या मोठ्या निर्णयानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर याप्रकरणी वेगवेगळ्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे.

महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती, हा शेतकऱ्यांचा विजय आहे. आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेतही अनेक बदल करण्याची गरज आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे.

दादा भुसे यांनी कृषी सिंचन योजनेबद्दलही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ५५ टक्के अनुदानाव्यतिरिक्त २५ टक्के पुरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदानाव्यतिरिक्त ३० टक्के पुरक अनुदान कमाल हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे, यासाठी लागणारा अतिरिक्त भार राज्य शासन देणार आहे, असे दादा भुसे म्हणाले आहेत.

याआधी योजनेत अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त अशा एकूण २४६ तालुक्यांचा समावेश होता. आता शासनाने उर्वरित १०६ तालुक्यांचाही यामध्ये समावेश केला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व तालुक्यांमधील शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

राज्यामध्ये आतापर्यंत २५.७२ लक्ष हेक्टर क्षेत्र सुक्ष्म सिंचनाखाली आलेले असून या नवीन योजनेमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता ५८९ कोटी रकमेस शासनाची प्रशासकिय मान्यता आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र असलेल्या शेतकऱ्यांना निवडण्यासाठी शासनाने एक पोर्टल सुरु केले आहे. त्यावर ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना अर्ज करुन या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महाडीबीटी पोर्टलवरवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता.

महत्वाच्या बातम्या-

सिक्सर मारल्यामुळे संतापला शाहीन आफ्रिदी, फलंदाजाला बॉल मारुन केली दुखापत; पहा व्हिडिओ
रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला, आपल्या खेळाडूंना स्वातंत्र्य देणं खुप गरजेचं कारण…
दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढेही झुकली दिल्ली! आंदोलकांच्या मागण्यांना यश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.