शेतकऱ्यांना अशी वागणूक मिळणार असेल तर या पुरस्कारांचे काय करू? ३० खेळाडू करणार पुरस्कार परत..

दिल्ली । मोदी सरकारने लागू केलेल्या कृषि कायद्याच्या विरोधात आता देशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. यासाठी दिल्लीत आंदोलन देखील सुरू आहे. सरकारने यावर लवकर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. आंदोलनाच्या मुद्द्यावरुन आता शेतकऱ्यांना अनेक स्तरांमधून पाठिंबा मिळत आहे.

शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्यांच्या यादीमध्ये आता पद्मश्री तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त माजी खेळाडूंचाही समावेश झाला आहे. या माजी खेळाडूंनी सरकारला पदके परत करण्याची घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांविरोधात बळाचा वापर करणे कोणत्याही अर्थाने योग्य नसून आम्ही या गोष्टीचा विरोध करत आहोत, असे या खेळाडूंनी म्हटले आहे. माजी बास्केटबॉलपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेता सज्जन सिंह चीमा हे शेतकरी आंदोलनाला खेळाडूंचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

चीमा यांच्या या मोहिमेला काही प्रमाणात यश आले आहे. ३० पेक्षा अधिक माजी ऑलिम्पिक तसेच इतर मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करुन पदके मिळवणाऱ्या खेळाडूंनी पाठिंबा दिला आहे.

यामध्ये करतास सिंह, सज्जन सिंह चीमा, राजबीर कौर यांच्यासहीत ३० खेळाडू राष्ट्रपतींकडे भेटीसाठी वेळ मागणार आहेत. राष्ट्रपतींनी वेळ न दिल्यास हे खेळाडू ५ डिसेंबर रोजी दिल्लीत जाऊन आपले पुरस्कार राष्ट्रपती भवनाबाहेर ठेऊन येणार आहेत. दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी केंद्र सरकराने अश्रुधुराचा वापर करणे योग्य नव्हते असे मत या खेळाडूंनी व्यक्त केले.

आम्ही सर्वजण शेतकऱ्यांची मुले आहोत, मात्र शेतकऱ्यांना अशा प्रकारे वागणूक दिली जात असेल तर या पुरस्काराचे काय करू असा प्रश्न खेळाडूंनी उपस्थित केला आहे. यामुळे यावरून देखील आता सरकारवर दबाव वाढणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.