दिल्ली हिंसाचारावर अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले…

मुंबई | काल प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले आहे. दिल्लीतील हिंसाचारावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.

यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘देशाची राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी जे घडलं आहे, ते नक्कीच क्लेशदायक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपणच धुडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी, हे फारच दुर्दैवी आहे.’

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘२६ जानेवारी या दिवशी प्रजा मालक झाली. मात्र, अशा पवित्र दिनी आपणच धुडगूस घालून राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करावं, हे चुकीचं आहे,’ असे म्हणत अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा अद्यापही कायम आहे.

याच पार्श्वभूमीवर येत्या ३० जानेवारीला अण्णा हजारे कृषी कायद्यांविरोधात उपोषणाला बसणार होते. मात्र, त्यापूर्वीच हिंसाचार घडून आल्याने हजारे कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
हिंसक आंदोलनामागे काँग्रेसचा हात असण्याची शक्यता;  गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप
शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला पडलं महागात; सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने आमदाराचा राजीनामा; केले ‘हे’ गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.