Share

शेतकऱ्याची भन्नाट कामगिरी! १५ देशांत निर्यात केली फूड प्रोसेसिंग मशीन, ८००० लोकांना दिला रोजगार

हरियाणातील शेतकरी धरमबीर कंबोज हे फूड प्रोसेसिंग मशीनची निर्मिती करतात. त्यांच्याकडे  अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन पदवी देखील नाही. असे असूनही त्यांची मशीन्स इतकी चांगली आहेत की परदेशातून ऑर्डर्स येतात. आतापर्यंत त्यांनी १५ देशांमध्ये या मशीन्सची निर्यात केली आहे. फूड प्रोसेसिंग मशीन्स बनवून ते स्वतःचे उत्पन्न तर वाढवत आहेतच शिवाय शेतकऱ्यांना मदतही करत आहेत. यासोबतच त्यांनी आतापर्यंत ८००० लोकांना रोजगार दिला आहे.

धरमबीर कंबोज सुरुवातीपासूनच प्रयोगशील होते पण फूड प्रोसेसिंग मशीन बनवण्याची कल्पना त्यांना रेल्वे प्रवासादरम्यान आली. वास्तविक, तेव्हा कंबोज अजमेरला जाणार होते. त्यांच्या शेजारी शेतकरी बसले होते. या संवादादरम्यान त्यांना आवळ्याची प्रक्रिया आणि गुलाबपाणी काढताना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. तेव्हाच कांबोज यांनी शेतीच्या कामांसाठी प्रोसेसिंग मशीन बनवण्याचा निर्णय घेतला.

कंबोज सांगतात की, मी फूड प्रोसेसिंग मशीन बनवली, पण सुरुवातीला त्यांच्या दर्जा चांगला नव्हता. तेव्हाही बाजारात अशी यंत्रे नव्हती. २०१२ मध्ये कंबोज यांनी नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनच्या मदतीने मशीनमध्ये सुधारणा केली आणि आज हे मशीन एका तासात २०० लिटर रस काढते. जरी ते तितके सोपे नव्हते. दहावीपर्यंत शिकलेल्या कंबोजला या मशीनचा प्रोटोटाइप बनवण्यासाठी ८ महिने लागले होते .

सुरुवातीच्या यशाने आनंदित झालेल्या कंबोजने २०१७ मध्ये त्यांची कंपनी धरमबीर फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड स्थापन केली. आज त्यांचे देशभरात ग्राहक आहेत. यासोबतच ते त्यांची मशीन १५ देशांमध्ये निर्यात करतात. सध्या त्यांची कंपनी दर महिन्याला १५ ते २० मशीन बनवते. गेल्या वर्षी आमची उलाढाल एक कोटींवर पोहोचल्याचे कंबोज यांनी सांगितले. आमचा प्रयत्न अशी मशीन्स बनवण्याचा आहे, ज्यामुळे शेतकर्‍यांचा वेळ वाचेल आणि खूप कमी मेहनत घ्यावी लागेल.

भविष्यातील योजनांबद्दल बोलताना ते म्हणतात की कंपनीची फूड प्रोसेसिंग मशिन्स ५ वर्षांत जवळपास १०० देशांमध्ये निर्यात करण्याचा मानस आहे. या आर्थिक वर्षात व्यवसाय २ कोटी रुपयांपर्यंत आणि आर्थिक वर्ष २७ पर्यंत सुमारे १० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. कंबोज यांनी आतापर्यंत सुमारे ९०० मशिन्सची विक्री केली असून, त्यामुळे सुमारे ८००० लोकांना रोजगार मिळाला आहे.

आर्थिक तुमची गोष्ट

Join WhatsApp

Join Now