एका मळक्या कपड्यातील शेतकऱ्यानं अख्ख पोलीस स्टेशन सस्पेंड केलं होतं; वाचा पुर्ण किस्सा

ही गोष्ट आहे साल १९७९ ची. संध्याकाळचे सहा वाजले होते. एक शेतकरी ईटावा जिल्ह्याच्या उसराहार पोलीस स्टेशनमध्ये मळलेला कुर्ता आणि चुरगळलेले धोतर घालून आला होता. त्याला त्याच्या हरवलेल्या बैलाची तक्रार नोंदवायची होती.

त्याने इन्स्पेक्टरला हरवलेल्या बैलाची तक्रार लिहून घेण्यासाठी विनंती केली. इन्स्पेक्टरने शेतकऱ्याला तीन-चार इकडचे तिकडचे प्रश्न विचारले आणि रिपोर्ट न लिहिताच जायला सांगितले. शेतकरी काहीच बोलला नाही तो खुर्चीवरून उठला आणि स्टेशनच्या बाहेर निघाला.

इतक्यात त्यातील एक हवालदार शेतकऱ्याला म्हणाला, बाबा रिपोर्ट लिहून घेतो पण काही पैसे द्यावे लागतील. शेवटी ३५ रुपयांमध्ये इन्स्पेक्टर तक्रार नोंदवायला तयार झाला. त्याकाळी ३५ रुपयांची किंमतही खूप होती. लेखापालने तक्रार लिहून घेतली आणि शेतकऱ्याला विचारले की, बाबा सही करणार की अंगठा लावणार?

शेतकरी म्हणाला सही करणार. मग लेखापालने शेतकऱ्याला रिपोर्टचा कागद दिला. रिपोर्टचा कागद घेतल्यानंतर शेतकऱ्याने पेनसोबत स्टॅम्प पॅडपण उचलले. हे पाहिल्यानंतर लेखापाल विचारात पडला की, ह्याला जर सही करायची आहे मग स्टॅम्प पॅडची याला काय गरज आहे?

शेतकऱ्याने सही करताना नाव लिहिले ‘चौधरी चरण सिंह’ आणि मळलेल्या कुर्त्याच्या खिशातून एक स्टॅम्प काढला आणि त्या निकालाच्या कागदावर मारला. स्टॅम्पवर लिहिले होते की, ‘प्रधानमंत्री भारत सरकार’. हा सगळा प्रकार पाहून पूर्ण पोलीस स्टेशन हादरले होते.

कारण जो माणूस मळलेला कुर्ता घालून पोलीस स्टेशनमध्ये बैल हरवल्याची तक्रार नोंदवायला आला होता ते दुसरे तिसरे कोणी नसून शेतकरी नेते आणि त्याकाळचे भारताचे प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह होते. त्यावेळी ते पोलीस स्टेशनमध्ये पाहणी करायला आले होते. आपल्या गाड्यांचा ताफा त्यांनी पोलीस स्टेशनपासून लांब उभा केला होता.

त्यांनी येताना आपल्या कुर्त्यावर माती लावली होती. जेणेकरून त्यांना कोणी ओळखू शकले नाही. त्यांनी त्या वेळेस उसराहारचे पूर्ण पोलीस स्टेशन सस्पेंड केले होते. शेतकरी आजही त्यांना मानतात. आज देशाला त्यांच्यासारख्या नेत्यांची गरज आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.