पुणे । शेतकऱ्यांच जीवन म्हणजे त्यामध्ये चढउतार असतात. त्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला कधी चांगले पैसे मिळतील हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा आपण बघत असतो की लाखोंचा खर्च करून देखील पैसे मिळत नाहीत.
अशीच व्यथा आंबेगाव तालुक्यातील शेतकरी योगेश वाव्हळ व संतोष कोल्हे यांच्या बाबतीत घडली आहे. त्यांनी चार एकर क्षेत्रावर फ्लॉवरची लागवड केली, त्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये भांडवली खर्च केला. पुढे चांगला बाजार भाव मिळून चांगले पैसे होतील अशी आसा होती, पण त्यांच्या पदरी निराशा आली आहे.
त्यांनी रोपे, जमिनीची मशागत, औषधे यासाठी तीन लाख रुपये खर्च केला. आता मात्र किलोला दोन रुपये दर मिळाल्याने आता हा खर्च कसा फेडायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.
गेले दोन महिने ते रात्रंदिवस रानात राबत आहेत. चांगले पैसे मिळतील अशी अपेक्षा त्यांची होती. शेतात वीज देखील रात्रीची असल्याने रात्री देखील त्यांनी फ्लॉवरला पाणी दिले. मात्र असा बाजार भेटल्याने त्यांनी आता काय करावे हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन महिन्यापुर्वी अशाच प्रकारे दोन एकरावर कोबी पिक घेतले अवघ्या १५ पिशव्या काढल्या आणि पिकात मेंढया सोडल्या त्यावेळी मोठे नुकसान सोसावे लागले. आणि आता सुद्धा अशाच प्रकारे निराशा झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.