Farmer Success Story : मुंबईत एल अँड टी इन्फोटेक (L&T Infotech) या नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर अभियंते म्हणून काम करणारे दिलीप परब (Dilip Parab) आणि त्यांची पत्नी गौरी परब (Gauri Parab) हे दाम्पत्य आपल्या कोकणातील मूळ गावात परतले आणि शेतीत आपलं करिअर घडवण्याचा निर्धार केला. त्यांनी आपली उच्चपगाराची नोकरी सोडून सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील तिठवली (Tithavali) गावात शेतीची सुरुवात केली.
सेंद्रिय शेतीची वाटचाल
वर्ष २०२१ मध्ये त्यांनी ‘लेमनग्रास (Lemongrass)’ म्हणजेच गवती चहा या औषधी वनस्पतीच्या सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. सुरुवातीला एक एकरावर प्रयोग केला, पण चांगल्या प्रतिसादामुळे आज त्यांच्याकडे आठ एकर शेती आहे, त्यातील सहा एकर जमीन स्वतःची असून दोन एकर भाड्याने घेतली आहे.
लेमनग्रासमधून दरवर्षी लाखोंचा व्यवसाय
लेमनग्रासचे पीक वर्षभर चालते, आणि त्याची वर्षातून तीन-चार वेळा कापणी करता येते. एका टन लेमनग्रासपासून सुमारे सात लिटर तेल निघते. या तेलाला १२०० ते १५०० रुपये प्रति लिटर दर मिळतो. त्यांनी आपल्या शेतात छोटं ऊर्धपातन युनिट उभारले आहे, जिथे हे तेल तयार केलं जातं आणि थेट औषध व सौंदर्यप्रसाधन कंपन्यांना विकलं जातं. गेल्या वर्षी त्यांनी या व्यवसायातून सुमारे ३० लाख रुपयांची उलाढाल केली.
उत्पादनांचा विस्तार आणि स्थानिकांना रोजगार
ते फक्त तेल विक्रीवर थांबले नाहीत. लेमनग्रासपासून हर्बल फ्लोअर क्लीनर आणि नैसर्गिक साबण तयार करत आहेत. हे उत्पादन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध असून, पॅकिंग शाश्वत आणि प्लास्टिकमुक्त ठेवले जाते. हे साबण नारळाच्या तेलासोबत मिसळून लाकडी साच्यात तयार होतो आणि गावातील महिला ते वाळवून, कापून, पॅक करतात.
वाढत्या मागणीमुळे, त्यांनी गावातील आणखी तीन शेतकऱ्यांशी करार केला आहे, जेथून ते कच्चा माल खरेदी करतात आणि त्यांना योग्य बाजारभाव देतात. यामुळे स्थानिक पातळीवरही रोजगारनिर्मिती होत आहे.