Share

Farmer Success Story: बीडमधील शेतकऱ्याने फक्त 70 गुंठ्यात घेतले 10 लाखांचे उत्पन्न! वाचा कसा केला हा कारनामा

Farmer Success Story:  पारंपरिक शेतीतून नफ्याची शक्यता कमी असल्याने अनेक शेतकरी आता नवनवीन प्रयोग करत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठेचा अभ्यास आणि वेगवेगळ्या पिकांवरील लक्ष केंद्रीत करत आधुनिक शेतीकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. याचेच एक यशस्वी उदाहरण म्हणजे बीड (Beed) जिल्ह्यातील वडवणी (Wadvani) तालुक्यातील कुंपा (Kumpa) गावचे शेतकरी किशोर वडचकर (Kishor Vadchkar) यांनी साकारलेले यश.

रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग

किशोर वडचकर यांनी अवघ्या 70 गुंठे क्षेत्रात रेशीम शेतीचा (Silk Farming) प्रयोग यशस्वी करून जवळपास 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यांनी पोखरा योजनेअंतर्गत तुतीची लागवड केली आणि त्यातून 2024-25 मध्ये 1512.3 किलो रेशीम कोषांचे उत्पादन मिळवले. यासोबतच 102 किलो डागी डबल पोचट उत्पादनही मिळाले.

या उत्पादनाच्या विक्रीतून त्यांना आठ लाख 41 हजार 279 रुपये उत्पन्न मिळाले. आतापर्यंत त्यांनी आठ बॅच तयार केल्या असून प्रत्येक बॅचला किमान 470 रुपये ते कमाल 730 रुपये दर मिळाला. सरासरी 550 रुपये प्रतिकिलो दर मिळाल्यामुळे त्यांचे उत्पन्न चांगलेच वाढले आहे. येणाऱ्या बॅचमधून उरलेली रक्कम मिळाल्यास दहा लाख रुपयांचा टप्पा पार होईल, असा त्यांचा आत्मविश्वास आहे.

व्यवस्थापन आणि गुंतवणूक

शेतीचे व्यवस्थापन नीट करताना त्यांनी सुरुवातीला तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली. यामध्ये 26 बाय 72 फुटांचे शेड तयार करण्यात आले. यावर्षी साधारणतः दोन लाख रुपये खर्च झाला, मात्र कुटुंबातील सदस्यांच्या मदतीमुळे त्याचा भार कमी झाला.

रेशीम शेतीसह किशोर वडचकर हे सोयाबीन, ऊस, गहू आणि ज्वारी यासारखी पारंपरिक पिकेही घेतात. बीड जिल्ह्याचा वडवणी परिसर अवर्षणप्रवण असल्याने येथे शेती करणे सोपे नाही. मात्र त्यांनी रेशीम शेतीतून यश मिळवून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

या यशोगाथेवरून स्पष्ट होते की योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल, तर कमी क्षेत्रातसुद्धा मोठे उत्पन्न मिळवता येते. ‘विकेल तेच पिकेल’ या तत्त्वाचा विचार करून शेती केल्यास यशस्वी व्हायची शक्यता वाढते.

ताज्या बातम्या शेती

Join WhatsApp

Join Now