Farmer Success Story: उच्चशिक्षण पूर्ण करूनही अनेक तरुणांना अपेक्षित सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळत नाही. अनेकजण स्पर्धा परीक्षा, सीईटी, मुलाखती यांचा पाठपुरावा करूनही यशस्वी होत नाहीत. अशाच प्रवासातून गेलेला नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील दहीकळंबा (Dahikalamba, Kandhar) गावचा शरद शिंदे (Sharad Shinde, Nanded) हा तरुण आज शेतीतून यशस्वी उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एक आहे.
शरद यांनी बीएड आणि डीएडपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, स्पर्धा परीक्षा उत्तीर्णही झाल्या. तरीही नोकरी मिळाली नाही. मग त्यांनी पारंपारिक नोकरी शोधण्याचा मार्ग सोडून दिला आणि स्वतःच्या शेतातूनच नवा अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला वडील पारंपारिक शेती करत असताना शरद यांनी परिस्थितीचा अभ्यास केला. त्यातून त्यांना लक्षात आले की जुनी पद्धत नफा देणारी नाही. म्हणून त्यांनी शेती पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आणण्याचे ठरवले. पारंपारिक पिकांचा त्याग करून त्यांनी भेंडी, दोडका, मिरची, टोमॅटो अशा भाजीपाला पिकांची लागवड केली.
शेतीत मल्चिंग पेपर वापरून मातीचे तापमान नियंत्रित केले, ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचा अचूक वापर केला आणि सेंद्रिय शेणखताद्वारे उत्पादनाची गुणवत्ता टिकवली. वेलवर्गीय पिकांना बांबूचा आधार देऊन चांगली वाढ सुनिश्चित केली.
फक्त ₹50,000 च्या सुरुवातीच्या गुंतवणुकीतून तीन महिन्यांत त्यांनी जवळपास ₹5 लाखांचे उत्पन्न कमावले. विक्रीसाठी त्यांनी कंधार, नायगाव आणि नांदेड येथील व्यापाऱ्यांशी थेट संपर्क साधला. आज त्यांचा दर्जेदार भाजीपाला जागेवरच विकला जातो. व्यापारी त्यांच्याशी थेट संपर्क करून खरेदी करतात.
या यशामध्ये शरद यांच्या कुटुंबानेही मोलाची साथ दिली. त्यांच्या कथेतून स्पष्ट होते की, नोकरीच्या मागे वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतीतूनही लाखोंचे उत्पन्न मिळू शकते.