Farmer Success Story: केवळ स्थानिक बाजारावर अवलंबून न राहता थेट परदेशात आपला शेतमाल विकण्याची जिद्द काही शेतकरी आज दाखवत आहेत. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे बुलढाणा (Buldhana District) जिल्ह्यातल्या पंचाळा (Panchala Village) गावातल्या अनिल देविदास खानझोड (Anil Khanjod) या शेतकऱ्याची. त्यांनी रोजगार हमी योजनेचा (MNREGA) आधार घेत 15 एकरांवर केळीची बाग फुलवली आणि आज त्यांच्या शेतातून थेट इराण (Iran Export Market)मध्ये केळीची निर्यात होत आहे!
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील (Sangrampur Region) पंचाळा गावात या यशस्वी प्रयोगाची सुरुवात झाली. इथल्या अनेक शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात केळीला अत्यल्प दर मिळत होता. या साखळीला तोडत अनिल खानझोड यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केलं.
केवळ दर्जेदार उत्पादन असून उपयोग नाही, तर निर्यातक्षम माल तयार करायला व्यवस्थापनात काटेकोरपणा हवा. हे जाणून त्यांनी पाणी, खते, कीड व्यवस्थापन याकडे विशेष लक्ष दिलं. परिणामी त्यांच्या केळीला थेट शेतावर 1900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला! एवढंच नव्हे तर 21 जुलै 2025 रोजी त्यांच्या शेतातून पहिली गाडी थेट इराणमध्ये रवाना झाली.
या सगळ्या प्रवासात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (MNREGA) भूमिका निर्णायक ठरली. या योजनेच्या साहाय्यानं त्यांनी ही संपूर्ण बाग तयार केली. यामुळे इतरही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेऊन निर्यातक्षम शेती करण्याची प्रेरणा मिळू शकते.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील (Dr. Kiran Patil) यांनी या उपक्रमाचं कौतुक करताना सांगितलं की, “पंचाळा गावातून केळीची निर्यात होणं ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
आज केवळ पंचाळाच नव्हे तर विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये केळीची लागवड झपाट्यानं वाढते आहे. ही यशोगाथा दाखवते की योग्य नियोजन, सरकारी योजना आणि नवनवीन बाजारपेठांची ओळख यामुळे शेतकरीही जागतिक पातळीवर आपली छाप पाडू शकतो.