Salim Merchant : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेवर देशातील सर्वसामान्य नागरिकांसोबतच बॉलिवूडमधील कलाकारांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत आपल्या भावना मांडल्या.
सलीम मर्चंटचा संताप अनावर
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक सलीम मर्चंट(Salim Merchant) नेदेखील एक भावनिक व्हिडीओ शेअर करत या घटनेबद्दल तीव्र शोक आणि राग व्यक्त केला. सलीम म्हणतो,
“फक्त हिंदू असल्यामुळे हे निष्पाप लोक मारले गेले का? हे हल्लेखोर मुस्लिम आहेत का? नाही, हे दहशतवादी आहेत. कारण इस्लाम असं काही शिकवत नाही. इस्लाम सांगतो की धर्माच्या बाबतीत सक्ती असू नये. आज मला वाटतंय की मी मुस्लिम आहे याची लाज वाटते.”
तो पुढे म्हणतो, “माझे हिंदू बांधव इतक्या क्रूरपणे मारले गेले, हे पाहून हृदय हेलावलं आहे. गेल्या काही वर्षांत शांततेकडे वाटचाल करत असलेला काश्मीर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत सापडला आहे. हे सगळं केव्हा थांबणार?”
“ओम शांती” – पीडित कुटुंबांना श्रद्धांजली
सलीम मर्चंटने(Salim Merchant) आपल्या व्हिडीओमध्ये पीडित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत “ओम शांती” म्हणत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. “माझं दुःख शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. या क्रूर घटनेत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबीयांना देव शक्ती देवो,” असंही तो म्हणाला.
मुनव्वर फारुकीचा पाठिंबा
सलीम मर्चंटच्या(Salim Merchant) या व्हिडीओवर सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद उमटत आहे. दरम्यान, प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनेही या व्हिडीओची स्टोरी शेअर केली असून त्यावर “Fact” असं लिहित त्याला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.
हिंसेच्या पार्श्वभूमीवर उभा राहतोय माणुसकीचा आवाज
दहशतवादाने उध्वस्त झालेल्या अनेक घरांमधून हंबरडा फुटतोय, पण सलीम मर्चंटसारख्या कलाकारांच्या भावनिक प्रतिक्रियांनी एक गोष्ट स्पष्ट केली – माणुसकी अजूनही जिवंत आहे. धर्मापेक्षा वरचढ ठरणाऱ्या अशा आवाजांना समाजातून मिळणारा पाठिंबा हेच सध्याच्या काळातली सत्वाची गरज आहे.
famous-singer-salim-merchant-emotional-after-pahalgam-attack