Gold Rate : साधारणपणे आठवड्याच्या सुरुवातीला महागाईचं सावट वाढतं, पण या सोमवारने मात्र सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा श्वास दिला आहे. लग्नसराईच्या हंगामात दर कमी होणं म्हणजे खऱ्या अर्थाने सोन्यासारखाच आनंद. बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या भावात झालेली घसरण पाहून ग्राहकांनीही दिलासा व्यक्त केला.
सकाळपासूनच वायदे बाजारात (Futures Market) सोन्या-चांदीच्या दरात अनपेक्षित घसरण दिसून आली. सोन्याच्या वायदा दरात मोठी पडझड नोंदवण्यात आली असून सध्या सोन्याचा भाव ₹1,23,002 इतका असून तब्बल ₹1,183 रुपयांची घट आहे. त्याचप्रमाणे चांदीचा वायदा दरही घसरून ₹1,53,070 रुपयांवर आला असून आज ₹851 रुपयांनी स्वस्त झालेली चांदी ग्राहकांसाठी अधिक परवडणारी ठरली आहे.
सराफा बाजारातील हालचाल
गेल्या आठवड्याभरापासून सराफा बाजार (Jewellery Market) देखील मंदावलेला दिसत आहे. सतत किंचित घसरण होत असल्याने सोने खरेदीदारांची उत्सुकता वाढली आहे. सोन्या-चांदीच्या दरात दररोज सुमारे ₹100 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.
सध्याच्या घसरणीनुसार 10 ग्रॅम:
-
22 कॅरेट सोनं : ₹1,15,340
-
24 कॅरेट सोनं : ₹1,25,830
देशातील वेगवेगळ्या शहरात दरांमध्ये मोठा फरक कायम असून चेन्नईमधील सोन्या-चांदीचे दर सर्वाधिक आहेत. विशेष म्हणजे चेन्नई आणि मुंबई या दोन महानगरांमधील चांदीच्या भावात तब्बल ₹8,000 रुपयांचं अंतर दिसत आहे.
सोन्या-चांदीचे दर का घसरले?
सोने-चांदीचे दर कमी का झाले, हा प्रश्नही अनेकांना पडतो आहे. जागतिक बाजारातील तणाव काही प्रमाणात निवळल्यामुळे धातूंच्या दरांवरचा दबाव हलका झाला आहे. याशिवाय, अमेरिकन सरकारनं निवडक वस्तूंवरील करांमध्ये केलेली कपात आणि डिसेंबर महिन्यात व्याजदर कपात होण्याची शक्यता कमी झाल्याचं चित्र या दरांच्या घसरणीस कारणीभूत ठरल्याचं स्पष्ट होत आहे.