माजी सैनिकांची चीनविरुद्ध डरकाळी; आम्ही चीनला धूळ चारू

 

इंदूर | लडाखमधील भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर देशात चीनविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. भारतीयांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. काही चीनी ऍप्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

याचबाबतीत इंदूरमधील माजी सैनिकांनी राष्ट्रपतींना एक पत्र लिहिलं आहे. चीनशी दोन हात करण्यासाठी आम्ही भारतीय सीमेवर जाण्यास तयार आहोत असं त्यांनी त्या पत्रात लिहिलं आहे.

माजी सैनिक आणि इंदूरच्या व्हेटेरन्स असोसिएशनच्या अधिकाऱ्यांसह ५० माजी सैनिकांनी हे पत्र लिहिलं आहे. त्यांनी खासदार शंकर लालवानी यांच्याकडे हे पत्र सुपूर्त केले आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एल. एल. शर्मा म्हणाले, “राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात सेवानिवृत्त झालेल्या जवानांची नावे आणि ते ज्या युनिटमधून निवृत्त झालेत त्या युनिटची नावे आहेत”.

सध्या जी परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीनुसार हे माजी सैनिक कामावर परत रुजू होण्यासाठी तयार आहेत. आणि त्यासाठी त्यांना केंद्र सरकारकडून कसलेही वेतन नको आहे. व्हेटेरन्स असोसिएशनचे सुमारे २०० माजी सैनिक आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.