Jyoti Malhotra : लोकप्रिय ट्रॅव्हल व्ह्लॉगर आणि यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी तिला हरियाणाच्या हिसार येथून ताब्यात घेतलं असून, तिच्यावर देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
पाकिस्तान उच्चायुक्तालयाशी संपर्क, हेरगिरीचा प्रारंभ
ज्योती मल्होत्रा ही सोशल मीडियावर ट्रॅव्हल कंटेंट तयार करणारी प्रसिद्ध व्ह्लॉगर असून, ती पाकिस्तानच्या हाय कमिशनमध्ये कार्यरत असलेल्या दानिश हसन-उर-रहीम या अधिकाऱ्याच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. 2023 साली व्हिसाच्या निमित्ताने तिची दानिशशी भेट झाली, त्यानंतर त्यांच्यात मोबाईलवर संपर्क सुरू झाला. दानिशच्या मार्गदर्शनाखाली तिला पाकिस्तानात प्रवासासाठी पाठवण्यात आलं, जिथे तिचा गुप्त माहिती देण्याचा व्यवहार सुरू झाला.
पाकिस्तान दौऱ्यादरम्यान गुप्त भेटीगाठी
ज्योतीने दोन वेळा पाकिस्तानला भेट दिली असून, तिथे अली अहवान नावाच्या व्यक्तीने तिच्या निवास आणि प्रवासाची व्यवस्था केली. याच व्यक्तीने तिला पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी ओळख करून दिली. त्या दरम्यान ती शाकीर आणि राणा शाहबाज या दोन संशयित व्यक्तींनाही भेटली. शंका येऊ नये म्हणून तिने शाकीरचा फोन नंबर “जाट रंधावा” या बनावट नावाने सेव्ह केला होता.
दहशतवादी हल्ल्याआधी काश्मीर दौरा
सुरक्षा यंत्रणांनी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चौकशी केली असता, एक महत्त्वाची बाब उघडकीस आली. ज्योती फेब्रुवारी महिन्यात श्रीनगर आणि पहलगाम येथे गेली होती – ही वेळ पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एक महिना आधीची होती. यामुळे तिच्या प्रवासावर संशय आणखी गडद झाला.
सोशल मीडियावरून गोपनीय माहितीची देवाणघेवाण
भारतामध्ये परतल्यानंतरही ती पाकिस्तानातील संबंधित व्यक्तींशी संपर्कात राहिली. स्नॅपचॅट, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम यांसारख्या अॅप्सचा वापर करून ती देशविरोधी माहिती शेअर करत होती. तिचा संवाद सतत पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांशी सुरू होता.
पाच दिवसांची पोलिस कोठडी, चौकशीस सुरुवात
15 मे रोजी डीएसपी जितेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तिच्या घरावर धाड टाकत तिला अटक केली. त्यानंतर तिला हिसार न्यायालयात हजर करण्यात आलं आणि पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. हिसार सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, आता केंद्रीय गुप्तचर संस्था तिच्या संपर्कांची आणि गुप्त माहितीच्या पुरवठ्याची सखोल चौकशी करत आहेत.
देशविरोधी कारवायांवर कडक नजर
ही कारवाई पंजाब आणि हरियाणामधून अटक करण्यात आलेल्या सहाव्या पाकिस्तानी हेरप्रकरणी असून, सुरक्षा यंत्रणा अशा देशविरोधी नेटवर्कवर लक्ष केंद्रित करत आहेत. ज्योती मल्होत्रा यांचं प्रकरण हे सोशल मीडियाचा वापर करून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याच्या गंभीर प्रकारात समाविष्ट होत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
everything-came-to-light-through-traitor-jyoti-malhotras-instagram-reel